परदेशात केले समुपदेशन : वेळ लावला सत्कारणी, संजीव आणि सुरेखा देशपांडे यांचा उपक्रम
@ मनीषा सुभेदार/ बेळगाव
कोणत्याही संकटात किंवा अडचणीत असणाऱया माणसाला ‘भिऊ नको आम्ही सोबत आहोत’ एवढा विश्वास पुरेसा असतो. कोरोनाच्या संकटामध्येसुद्धा परस्परांना हा विश्वास देण्याची गरज आहे. त्यातही तरुण मुलांना या विश्वासाने आश्वस्त करत संकटाला सामोरे जाण्याची मानसिक तयारी करणे महत्त्वाचे असते. हेच काम बेळगावचे दांपत्य संजीव व सुरेखा देशपांडे यांनी अमेरिकेत केले. कोरोनाच्या लढाईमध्ये त्यांनी अमेरिकेत असताना आपला वेळ वेगळय़ा पद्धतीने सत्कारणी लावला. त्यामुळे अनेक मुलांचे मनोधैर्य टिकून राहण्यास निश्चितच मदत झाली आहे.
याबाबतचे आपले अनुभव सुरेखा यांनी अमेरिकेमधून ‘तरुण भारत’कडे कथन केले. त्या म्हणाल्या, प्रारंभी मुलगी आणि जावई यांच्या सहवासात खूप दिवसांनी मिळालेल्या निवांतपणात दोघेही रमलो. मुलीचे मोठे घर, फिरण्यास मोकळी जागा, रोजच्या गरजेच्या वस्तू सहज मिळत असल्याने छान बस्तान बसले. मात्र, हळूहळू या ‘कोविड-19’ नावाच्या अजगराने अजस्त्र रूप धारण करून जगाला पूर्णपणे आपल्या विळख्यात घ्यायला प्रारंभ केला. आमचे परतीचे तिकीट दोन वेळा रद्द झाले. मुलाकडे जाण्याचा बेतही रद्द झाला, ना त्याला आम्हाला येऊन भेटता आले ना आम्हाला त्याच्याकडे जाता आले.
अर्थात तो एकटा घरातील काम करत असताना त्याच्याशी बोलणे व्हायचे. त्याला थोडीफार स्वयंपाकाची सवय आहे. परंतु एकटय़ाने सतत काम केल्याने थकवा आल्यावर ना बाहेर जाऊन खाता यायचे ना स्वत: केल्याशिवाय जेवायला मिळायचे. मित्र, सहकारी, शेजारी कोणीच जवळ नसते. प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे यापेक्षा सतत मोबाईलवर बोलणे याने फारसे समाधान होत नाही.
मुलांशी फोन कौन्सिलिंग
कळत न कळत तिथे एकटी राहणारी मुले, त्यांच्या समस्या, अडचणी, कुचंबणा, ताण, दु:ख, निराशा यांना कशा सामोऱया जात असतील असा विचार मनात आला आणि मग सुरू झाले फोन कौन्सिलिंग. दुपारी आपल्याला बराच रिकामा वेळ असतो. तो सत्कारणी लावण्याचे ठरविले. सुरुवातीला परिचित मुलांशी बोलायला सुरुवात केली. ती प्रतिसाद देतील का, आपल्या अडचणी सांगतील का, अशी शंका होती. परंतु आज एक महिना सतत हे कौन्सिलिंग करताना जो प्रतिसाद मिळाला तो पाहता आपल्याला ही कल्पना सुचली हे फार बरे झाले, असे वाटते.
इथे येणारी भारतीय मुले काही शिकायला आली आहेत. काहींचे शिक्षण संपले आहे, काहींचे संपत आले आहे, काही मुले नेकरीच्या शोधात आहेत. परंतु कोरोनामुळे ती पार भेदरून गेली आहेत. त्यामुळे ती खूप मोकळेपणाने माझ्याशी बोलली. कारण त्यांच्याच सारखी मी त्याच परिस्थितीत राहते आहे, याची त्यांना कल्पना होती. त्यांच्या अडचणी भारतातील पालकांपेक्षा मी अधिक चांगल्या रीतीने समजू शकले.
फारशी ओळख नसतानाही अडचणीत कोणीतरी आपली मनापासून चौकशी करते आहे. समजावून सांगत आहे, धीर देत आहे, याचेच त्यांना खूप कौतुकही वाटते आणि आनंद झाला. माझ्यासारखेच त्यांचेही पालक काळजीने सारखे फोन करतात, विचारपूस करतात. परंतु त्यांनी अधिक काळजी करू नये, घाबरून जाऊ नये, म्हणून ती मुले सर्व परिस्थिती पूर्णपणे पालकांना सांगत नव्हती.
साहजिकच त्यांना आता पुढचे वेध लागले आहेत. आपण आता इथे किती दिवस राहू शकतो, आपल्याला नोकरी मिळेना, पालकांनी आपल्यासाठी कर्ज काढले आहे. त्याची परतफेड होईल ना, अशा अनेक प्रश्नांनी या मुलांना घेरले आहे. बाहेर कुठे जाता येत नसल्याने मानसिक ताणही वाढलेला आहे. जी मुले अपार्टमेंट शेअर करून राहतात, त्यांना परस्परांशी बोलता तरी येते. परंतु एकटे राहणे फार त्रासदायक असते. अनेकांना घरी जेवण बनविता येत नाही. पटकन काय करावे, घरात काय आणून ठेवावे समजत नाही आणि बाहेरून मागविणे खिशाला परवडते असे नाही.
मानसिक स्थिती आणि शारीरिक क्षमता महत्त्वाची
अशा वेळी मी विचार करून या मुलांना जमेल त्या सर्व बाबतीत सल्ला दिला, मार्गदर्शन केले, तर काही उपायही सुचविले. सर्वप्रथम त्यांनी कोणत्या गोष्टींकडे सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे, ते नीट समजावून सांगितले. मानसिक स्थिती आणि शारीरिक क्षमता सर्वाधिक महत्त्वाची आहे. म्हणून या परिस्थितीत त्यांना झेपतील असे साधे साधे पदार्थ कसे करावेत, हे शिकविले. कोणते पदार्थ घरी आणून ठेवावेत, आणि त्यांचा वापर कसा करावा हे सांगितले. व्यायाम कसा व कधी करावा याची माहिती दिली. योग्य वेळी आहार किती गरजेचा आहे, हे सांगतानाच घरातील साध्या वस्तू आणि पदार्थांचे महत्त्वही त्यांना समजावले.
सगळी मुले मनांनी खंबीर नसतात
सतत अभ्यास आणि काम हे मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा योग्य नाही. इतरही गोष्टी आवर्जुन केल्याने ताण कमी होतो, हे त्यांना सांगितले. भारतातून फोन करून काळजी घे, एवढेच बोलून पालकांची जबाबदारी संपत नाही. त्या मुलांना त्यांच्या परिस्थितीला नीट समजावून घेऊन त्यांना धीर देणे, आश्वस्त करणे महत्त्वाचे. सगळी मुले मनांनी खंबीर नसतात. घरापासून लांब, जगाचा अनुभव नाही. अनोळखी वातावरण, जबाबदारीची सवय नसणे, यामध्ये ती गांगरून जातात. अशा वेळी तुम्ही एकटे नाही, आम्हाला तुमची अडचण समजते, ही परिस्थिती बदलणार आहे, धीर धरा. इतका विश्वास मुलांमध्ये निर्माण झाल्याने मुले हळूहळू ताणतणावातून बाहेर आली, असे मला जाणवले.
कोविड-19 हा शाप की वरदान हे मला माहीत नाही. परंतु त्या निमित्ताने एका वेगळय़ा विश्वाचे भान मला आले. माझी मुले अमेरिकेत नसती तर कदाचित या मुलांचे मनोगत मीही समजू शकले नसते. माझा असा लांबलेला मुक्काम सत्कारणी लागल्याचे समाधान मला आहे, असे सुरेखा देशपांडे नमूद करतात.









