दिल्ली/प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड -१९ व्यवस्थापनासंदर्भात सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये राज्य आरोग्य प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी केरळ व महाराष्ट्रात दोन उच्च-स्तरीय बहु-शाखीय पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
बहुतांश सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशात कोविड -१९ मुळे बाधित होणाऱ्यांची तसेच मृत्यू पावलेल्यांची संख्या कमी होत असताना केरळ आणि महाराष्ट्रात अजूनही मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या या दोन राज्यांमध्येच देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी जवळपास 70 टक्के रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात पाठवण्यात येणाऱ्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) आणि डॉ. आरएमएल रुग्णालय, नवी दिल्ली येथील तज्ज्ञांचा समावेश आहे, तर केरळसाठीच्या पथकात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालय, तिरुअनंतपुरम आणि लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय, नवी दिल्लीमधील तज्ञांचा समावेश असणार आहे.