प्रतिनिधी/ खेड
खेड नगर परिषदेच्या एकविरा नगरातील दवाखान्यात कोविड सेंटर चालवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला ऑनलाईन सर्वसाधारण सभेत शिवसेना नगरसेवकांनी विरोध दर्शवला. मतदानादरम्यान शिवसेनेच्या एका नगरसेवकाने ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने झालेल्या समसमान मतांमुळे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी विशेषाधिकार वापरत हा ठराव मंजूर करून घेतला. यामुळे कोविड सेंटरमध्ये 20 ते 25 रूग्णांवर उपचार होण्यास मदत होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर शहरातही कोरोनाने थैमान घातले. गेल्या 3 महिन्यांत कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळले असून अनेक रूग्णांचा कोरोनाने मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून नगर परिषदेच्या मालकीच्या दवाखान्याचा वापर कमी प्रमाणात होत होता. कोरोनाच्या संकटामुळे या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्याचा महत्वाकांक्षी निर्णय नगराध्यक्ष खेडेकर यांनी घेतला. मात्र या निर्णयाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवल्यानंतर मतदान घेण्यात आले. मतदानादरम्यान शहर विकास आघाडी व शिवसेना यांची मते समसमान झाली. शिवसेनेच्या एका सदस्याने शहर विकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. याचवेळी नगराध्यक्ष खेडेकर यांनी नगराध्यक्षांना असलेला विशेषाधिकार वापरून कोविड सेंटरचा ठराव मंजूर करून घेतला. नगर परिषद दवाखान्यात सुरू होणाऱया या कोविड सेंटरमध्ये अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून पूर्ण क्षमतेने रूग्णांवर उपचारही होणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार व बंधन बँक यांच्या माध्यमातून नगर परिषदेस कार्डियाक रूग्णवाहिका उपलब्ध झाली असून ही सेवा पुरवण्यासाठी एखाद्या खासगी संस्थेला जबाबदारी देण्याचा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला. खासदार सुनील तटकरे युवा मंचकडून नगर परिषदेस प्राप्त झालेल्या रूग्णवाहिकेचा दर ठरवणे व शुल्क निश्चित करणे, रूग्णवाहिका कार्यक्षेत्र, राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह व फोटोबाबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. नगररचना योजना अंमलबजावणी करणे, या कामी येणाऱया खर्चास मान्यता देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. तसेच अन्य महत्वपूर्ण विषयांवरही चर्चा करण्यात आली.
कोविड सेंटरला विरोध संतापजनक
कोरोनाच्या संकटात जनतेच्या हितासाठी नगर परिषद दवाखानात सुरू करण्यात येत असलेल्या कोविड सेंटरला नगर परिषदेच्या आरोग्य सभापतींसह सेना नगरसेवकांनी केलेला विरोध ही संतापजनक बाब आहे. जनतेच्या सुख-दुःखात समरस होण्यास विरोधकांना काहीच स्वारस्य राहिलेले नसून जनतेप्रती नाळच तुटलेली आहे. यामुळे जनताच यापुढच्या निवडणुकीत त्यांना चपराक लगावेल.
-वैभव खेडेकर, नगराध्यक्ष, खेड.









