सुर्ली उपकेंद्रात लसीकरण शुभारंभ
वार्ताहर / औंध
कोरोना आपत्तीवर मात करण्यासाठी आता सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन लढूया. काळजी घेतली तर कोरोना डोईजड होणार नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊन ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करुन कोरोनाला हरवूया असे आवाहन हिंदकेसरी संतोष आबा वेताळ यांनी केले.
सुर्ली ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वेताळ म्हणाले कोरोना विरुध्दच्या लढाईत शासनाला मदत करुया. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त डोस उपकेंद्रात उपलब्ध करुन देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
निवास थोरात म्हणाले.कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसुत्रिचा वापर करून कोरोनाला रोखणे शक्य आहे. सागर शिवदास म्हणाले प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शासनाने कोविड लसीकरणावर भर दिला आहे. आपल्या उपकेंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे. ग्रामस्थांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. सरपंच दत्तात्रय वेताळ यांनी प्रास्ताविक केले. विजय भोगे यांनी आभार मानले.









