संपूर्ण जग ज्या लसीकरणाकडे डोळे लावून बसले होते, ते कोविड-19 च्या विरोधातील लसीकरण भारतासाठी आता अगदी वेशीवर येऊन पोचलेले आहे. कोविड-19 संक्रमणाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इंग्लड, रशिया आणि अमेरिकेमध्ये कोविडविरोधातील लसीकरणास सुरुवात झालेली आहे. आपल्याकडेही केंद्राने राज्यांना कोविडविरोधी लसीकरणाची मोहिम राबविण्यासाठी तयारी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ‘कोविशिल्ड’ आणि ‘को-व्हॅक्स’ या लसींना आपल्याकडे सुरुवातीस प्राधान्य दिले जाईल असे तज्ञांचे म्हणणे आहे. या लसीकरणासाठीची ‘ब्लू पिंट’ही नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या संक्रमणामुळे उद्भवलेली अनारोग्याची स्थिती, टाळेबंदी, अंगीकरण्याच्या नवीन आरोग्यदायी सवयी या सगळय़ाशी जुळवून घेणे, हे नाही म्हटले तरी आपल्या सर्वांसाठी एक आव्हान होते. काही अपवाद वगळता, आपण सर्वांनी मिळून या सर्व परिस्थितीला संयमाने आणि जबाबदारीने सामोरे गेलो. हाच समंजसपणा आपल्याला कोविडच्या विरोधातील लसीकरणाबाबतही दाखवयाचा आहे.
शासनाने जाहीर केलेल्या ‘ब्लू पिंट’नुसार 2021 च्या मध्यापर्यंत लसीकरणाच्या प्रथम टप्प्यात तीस कोटी नागरिकांना कोरोना विरोधातील लस देण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि वय वर्षे 50 पुढील नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वय वर्षे 50 पुढील नागरिकांमध्येही पन्नाशी पुढील नागरिक आणि साठी पुढील नागरिक, असे दोन गट करण्यात येणार आहेत. वय वर्षे साठ पुढील नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी निवडणूक केंद्रांच्या धर्तीवर लसीकरण केंदे उभारण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी
घराच्या अथवा कार्यालयाच्या जवळ ही लसीकरण केंदे उभारली जाणार आहेत. जिल्हा रुग्णालये, पालिका रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र यासारख्या शासकीय आरोग्य व्यवस्थांसोबतच शाळा, महाविद्यालये, समुदाय सभागृह इ. देखील लसीकरण केंद्रांसाठी वापरण्यात येणार आहेत. लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ‘कोविड व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क’ (को-विन) या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी करण्यासाठी छायाचित्र असलेल्या ओळखपत्रांची आवश्यकता असल्याचे ‘ब्लू पिंट’ मध्ये म्हटले आहे. निवडणुकीच्या वेळापत्रकाप्रमाणेच हे लसीकरण सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत केले जाणार आहे. लसीकरण केल्यानंतर लाभार्थीस तीस मिनिटे निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. लसीकरणाच्या एका केंद्रावर दिवसभरात शंभर ते दोनशे लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजले आहे. लाभार्थ्यास लसीकरण केंद्रावर एक ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असणार आहे. लस सुरक्षिततेसाठी शीत साखळी, इतर आवश्यक काळजी यंत्रणा, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, तीन प्रशस्त खोल्या, लाभार्थींच्या माहितीची नोंद इ. व्यवस्था लसीकरण केंद्रावर उभारण्यात येणार आहे. राज्यांना लस पुरविण्याकरीता त्या-त्या राज्यातील आरोग्य कर्मचारी, वयोवृद्ध नागरिक यांची माहिती राज्यांनी केंद्रांला कळवायची आहे. लसीची सुरक्षा, लस वितरण व्यवस्थेतील
अनुचित प्रकारांना आळा, लाभार्थींमध्ये ऐनवेळी शारीरिक गुंतागुंत उद्भवल्यास त्यासाठीची वैद्यकीय तत्परता यासारख्या गोष्टीची काळजी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी घेतली जाणार आहे.
व्यापक स्तरावर शिस्तबद्ध पद्धतीने हे अभियान राबविले जाणार आहे. देशातील 633 जिल्हय़ांमध्ये कोरोना विरोधातील लसीकरण मोहीम राबविण्यासाठी यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू आहे. या अभियानाकरिता केंद्र आणि राज्यातील तेवीस विविध मंत्रालय-विभागांवर, वेगवेगळय़ा प्रकारच्या जबाबदाऱया सोपवण्यात आल्या आहेत. या लसीकरण अभियानासाठी प्रारूप तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्याचे, शीत साखळी (कोल्ड चेन) नियंत्रित ठेवण्याचे प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. जवळपास 1.54 लाख परिचारिका या अभियानात लस देण्याकरिता प्रशिक्षित केल्या जाणार आहेत. या मोहिमेत सर्व लसीकरण केंद्रांना रुग्णालयांशी जोडून घेण्यात आलेले आहे, जेणेकरून लसीकरणानंतर काही आरोग्य समस्या उद्भवल्यास तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध होऊ शकेल. या अभियानासाठी 29 शीत साखळी केंद्र, 240 ‘वॉक इन कूलर’, 70 ‘वॉक इन फ्रिजर’, 45 हजार ‘आईस लिंक रेफ्रिजरेटर, 41 हजार ‘डीप फ्रिजर’ आणि 300 ‘सोलर रेफ्रिजरेटर’ उपयोगात आणले जाणार आहेत. एवढे मोठे व्यापक अभियान नागरिकांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होणे अशक्मय आहे.
कोरोना विरोधातील लसीकरण मोहिमेत सर्व नागरिकांनी संयम, शिस्त आणि नागरी कर्तव्ये यांचे पालन केल्यास लसीकरण केंद्रांवर विनाकरण उडणारा गोंधळ, बेशिस्तपणा, वेळेचा अपव्यय टाळता येऊ शकेल. ज्याप्रमाणे कोविड उपचार केंद्रांवर काही नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ‘मदतनीस’ म्हणून काम केले त्याचप्रमाणे हे लसीकरण यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता ‘स्वयंसेवक’ म्हणून नागरिकांनी पुढे यायला हवे. ज्ये÷ व्यक्तींना लसीकरण केंद्रावर अनेक प्रकारची मदत लागू शकते.
त्यांना भावनिक-मानसिक आधार देण्याकरिता युवा वर्गाने पुढाकार दाखवला पाहिजे. लसीकरणाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरणार नाहीत याची नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कुठेही लसीकरणाचे थोडे काही दुष्परिणाम दिसून आले तर एखाद्या गोष्टीची पूर्णपणे खात्री न करता निव्वळ ‘टी आर पी’/लाईक्स वाढण्याच्या नादात समाज माध्यमे, वृत्तवाहिन्या इ. लोक संपर्क माध्यमांनी उतावीळपणा करून जनतेमध्ये साशंकता, भीती निर्माण होईल अशा गोष्टी टाळाव्या लागतील. जनतेचे हित लक्षात घेऊन या आरोग्यदायी उपक्रमाला गालबोट लागणार नाही याची जबाबदारी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. लसीकरणातील भ्रष्टाचाराला खतपाणी मिळणार नाही याची दक्षताही आपल्याच हातात आहे. खेडोपाडी नावनोंदणी करवून घेण्याकरिता अशिक्षित जनतेची अडवणूक होऊ शकते अथवा बोगस डॉक्टरांकडून लस म्हणून गरीब, अज्ञानी जनतेला फसवले जाण्याचे अनुचित प्रकार घडू शकतात, याविषयीची जनजागृती घडवून आणण्याकरिता नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. लसीकरण करून घेणाऱया लाभार्थींचा पुढील काही महिने पाठपुरावा होणे गरजेचे असणार आहे. कोरोना विरोधातील लसीकरण अभियानाची सुरुवात ही जे÷-वयस्क व्यक्तींपासून होणार आहे. आपल्या लहानपणी आपले पालक आपल्याला लसीकरणासाठी घेऊन गेलेले असतील, आता त्यांना लसीकरणासाठी घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे.
डॉ. स्वाती अमराळे-जाधव








