कोकणात कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर गेल्या महिनाभरात रुग्णवाढीचा दर कमालीचा वाढला आहे तर उपचाराच्या नावाखाली अक्षरशः लूट होत चालली आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याने कोरोनाबाधित खासगी रुग्णालयांकडे वळत आहेत. तेथे दाखल झालेल्यांची तर उपचाराच्या नावाखाली अक्षरशः लूट होत चालली आहे. आता लुटालुटीच्या तक्रारीनंतर बिलांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शासकीय रुग्णालयेच जर सुसज्ज केली आणि रुग्णांमध्ये त्यांच्या बाबतीत विश्वासाचे नाते निर्माण केले तर सर्वसामान्य लोक महागडय़ा उपचाराकडे जातीलच कशाला? त्यामुळे मूळ समस्येकडेच दुर्लक्ष होताना दिसत आहे. ‘जखम मांडीला आणि औषध शेंडीला’ अशीच काहीशी सध्या प्रशासनाची अवस्था झालेली दिसत आहे.
कोकणचा विचार केला तर रायगडमध्ये कोरोनाबाधित आणि मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल रत्नागिरी आणि नंतर सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा क्रमांक लागतो. सिंधुदुर्गात तर अलीकडच्या काही दिवसात रुग्णवाढीचा दर वाढल्याचे दिसून येत आहे. जिह्यात पावणेदोन हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण तंदुरुस्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिह्यातील रुग्णसंख्या 3 हजाराच्या पुढे गेली आहे. यातील सक्रिय रुग्ण संख्या 1200 च्या घरात आहे. तेथे मृत्यू दरही तीनच्या खाली आहे. रत्नागिरी जिह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 220 पर्यंत गेली आहे. जिह्याचा मृत्यूदर 3.25 टक्के वर पोचला आहे, तर बाधितांची संख्या आतापपर्यंत 6,769 वर पोहचली आहे. तसेच 4,916 बरे झालेल्यांची संख्या झाली आहे. रायगड जिह्यात सध्या 6 हजाराच्या पुढे कोरोनाचे रुग्ण आहेत, तर 1,100 हून अधिक जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिह्यात सध्या 6,500च्या पुढे कोरोनाचे रुग्ण आहेत. जिह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के तर मृत्यूदर 3 टक्के आहे.
कोकणात कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर गेल्या महिनाभरात रुग्णवाढीचा दर कमालीचा वाढला आहे. प्रारंभी शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार आणि सोयीसुविधा चांगल्या होत्या. त्यामुळे शासकीय कोविड सेंटर आणि शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्ण बिनधास्तपणे उपचार करून घेत होते. मात्र जसजशी संख्या वाढू लागली आणि त्यातच रुग्णालयांमध्ये सेवेत असलेले योद्धेच कोरोनाबाधित झाल्यानंतर शासकीय रुग्णालयातील परिस्थिती बदलून गेली. त्यातच आवश्यक मनुष्यबळ कमी पडू लागल्याने स्वच्छतेचे तीनतेरा वाजले. अपेक्षित उपचार मिळत नाहीत. रुग्णांकडे पुरेसे लक्ष नाही. इंजेक्शन्स, औषधांचा तुडवडा आणि रुग्णांच्या सेवेसाठी नातेवाईकांनाच तळ ठोकून बसावे लागत असल्याच्या असंख्य तक्रारी पुढे येऊ लागल्याने शासकीय रुग्णालयातील उपचाराचा नूरच बदलून गेला आहे. त्यामुळे असंख्य बाधित थेट खासगी कोविड सेंटरचा रस्ता धरत आहेत. सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरी जिल्हय़ात सध्या बिलांवरून मोठे रणकंदन माजले आहे. जिल्हय़ात शासकीयसह खासगी मिळून 25 कोविड सेंटरमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र जसजशी रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर उभारणीला परवानगी मिळत गेली तसतशी रुग्णालये फुल्ल होत गेली. यातूनच मग काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहे. यातच रुग्णालयातील उपचार खर्चाचा बिलांवरील आकडा पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ येऊ लागली आहे. आज कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱया रुग्णाला चाचण्यांसह दीड ते अगदी तीन लाखापर्यंत उपचाराची बिले येत आहेत. आज रुग्ण दाखल करतानाच दीड लाख खर्चाचे पॅकेज अगोदरच सांगून 24 तासात 40 हजार भरण्यास सांगितले जात आहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, तसेच डॉक्टर शुल्क अवास्तव आकारले जात असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. जिल्हय़ात अशा तक्रारींचा सूर चिपळुणात अधिक आहे. गेल्याच आठवडय़ात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या शुभारंभप्रसंगीच आमदार, अधिकाऱयांच्या उपस्थितीतच खासगी रुग्णालयात होत असलेल्या लुटीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱयाने प्रकाश टाकताना यावर नियंत्रण कुणाचे, असा सवाल केला होता. एका खासगी रुग्णालयात आठ दिवस उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या बिलामध्ये 30 हजार रु. ऑक्सिजनचे लावण्यात आले. पाचशे रु.ना एक सिलेंडर मिळतो, तर सदर रुग्णाला 60 सिलेंडर लागले असा याचा अर्थ होतो असे सांगितले गेले. या प्रकरणात प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास मोठा जऩक्षोभ उसळू शकतो असा धोक्याचा इशारा दिला होता. त्यातच रुग्णालयातील मृत्यूदर वाढू नये म्हणून काही रुग्णालये आवारात आलेल्या रुग्णवाहिकेमध्येच रुग्णाची ऑक्सिजन लेवल पाहून दाखल करून घ्यायचा निर्णय घेतात हे एक गंभीरच आहे.
तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱयांनी प्रत्येक तालुक्यात दोन अधिकाऱयांची नियुक्ती केली. तसेच खासगी रुग्णालयातील बिलांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता तपासणी होईल. अवास्तव बिलांची कदाचित वसुलीही होईल. मात्र शेवटी ती चौकशीच असल्याने यातून काय साध्य होईल ते पुढे येईलच. मात्र सध्याची परिस्थिती पाहता केवळ चौकशीवरच थांबून उपयोग नाही. मूळ दुखणे हे शासकीय रुग्णालयांचे आहे. त्यावर इलाज गरजेचा आहे. जिल्हय़ातील रुग्णालयांचा विचार केला तर एकटय़ा चिपळूणच्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 90हून अधिक ऑक्सिजन बेड, आवश्यक साहित्य सामुग्री, तसेच नऊ व्हेंटीलेटर असूनही रुग्णालयातील अर्ध्याहून अधिक बेड हे रिकामेच रहात आहेत. खासगी रुग्णालयांप्रमाणेच शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार पद्धत असतानाही रुग्ण दाखल होण्यास का घाबरत आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तपासणीला जातानाच रुग्ण खासगी रुग्णालयात बेड कुठे शिल्लक आहे हे शोधत असतो. एवढी परिस्थिती चिपळूणसारख्या शहरात निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालयातील लूटमारीला चाप लावायचा असेल तर रुग्णांमध्ये शासकीय रुग्णालयातील उपचार पद्धतीबाबत विश्वासाचे नाते निर्माण करणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयातील त्रुटी शोधून त्या दुरुस्त करण्याची गरज आहे. तसे झाले तर पुढचे काम सहज आणि सोपे राहणार आहे.
राजेंद शिंदे








