प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव झपाटय़ाने वाढतो आहे. त्यामुळे सरकारने जारी केलेल्या कोविड-19 मार्गसूचींचे प्रत्येकांनी पालन करावे. अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिला आहे.
शनिवारी सायंकाळी जिल्हय़ातील अधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी या संबंधी चर्चा केली. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, महानगरपालिका आयुक्त के. एच. जगदीश, पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, प्रांताधिकारी अशोक तेली, आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ आदी अधिकारी उपस्थित होते.
जनजागृतीसाठी विशेष अधिकाऱयांची नेमणूक
कोरोनाला थोपविण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठ आदी गर्दीच्या ठिकाणी कोविड मार्गसूचींचे काटेकोरपणे पालन होत नाही, असे दिसून येत आहे. म्हणून जनजागृतीसाठी विशेष अधिकाऱयांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंबंधी जिल्हाधिकाऱयांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. विशेष अधिकाऱयांनी आपल्या कार्यक्षेत्रात कोविड मार्गसूचींचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवण्याबरोबरच कोरोनाला थोपविण्यासाठी योगदान द्यायचे आहे. सध्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. 8 विधानसभा मतदार क्षेत्रांच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता जारी आहे. प्रचारसभा असो किंवा इतर कार्यक्रम असो मार्गसूचीनुसार अधिकाऱयांनी त्याला परवानगी द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली.
ज्या कार्यक्रमांना परवानगी दिलेली असते असे कार्यक्रम व निवडणूक प्रचाराच्या वेळी मार्गसूचींचे पालन होते का? यावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कडक कारवाई करण्याची सूचना जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी अधिकाऱयांना केली.