वार्ताहर / म्हैसाळ
दक्षिण आफ्रिकेत नव्याने सापडलेल्या ओमीक्रॉन या व्हेरीएंटची अवघ्या जगाने धास्ती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वच राज्याना दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनो रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना केल्या होत्या. त्या सर्वच उपायोजना तातडीने लागू करण्यात यावे यासाठी देशभरात सर्वच राज्यांना परत एकदा सतर्क राहावे लागते आहे. यामुळे तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वच आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
याचाच एक भाग म्हणून शेजारच्या कर्नाटक राज्याने तातडीने महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर कागवाड जवळ चेक पोस्ट उभारून कोरोना चाचणी पथक रात्रंदिवस तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे मिरज म्हैसाळ या महाराष्ट्र हद्दीतुन कर्नाटकात प्रवेश करताना सर्व प्रकारची प्रवाशी व मालवाहतूक वाहने अडवून मोठ्या प्रमाणात आरटीपीसीआर चाचणी करूनच पुढे कर्नाटकात प्रवेश दिला जातो आहे. मात्र कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशी व इतर वाहनांतील प्रवाशांना कोणत्याही प्रकारची कोरोना चाचणी न करता सगळे मोकाटपणे महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करीत आहे.
कोणत्याही प्रकारची तपासणी यंत्रणा या महाराष्ट्राच्या हद्दीत लावली नाही. म्हणजे कर्नाटकात कोरोना येतो मात्र महाराष्ट्र त येत नाही असे आहे का ? असा सवाल प्रवाशी वर्गातुन केला जात आहे. त्यामुळे तपासणी बाबतीत कर्नाटकात तपासणी यंत्रणा सुसाट आहे. मात्र महाराष्ट्रात ही यंत्रणा मोकाट आहे का ? अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यासाठी तातडीने या ठिकाणी चेक पोस्ट व कोरोना तपासणी यंत्रणा लावावी अशी मागणी होत आहे.अन्यथा परराज्यातील प्रवेश करणार्या प्रवाशामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.