प्रतिनिधी/ रत्नागिरी
कारण झाले गुहागरचे कोविड केंद्र. एका वरिष्ठ अधिकाऱयाने महिला आरोग्य अधिकाऱयाला चांगलेच खडसावले. तेही तब्बल रात्री 11 वाजता. अधिकाऱयांच्या भाषेमुळे महिला अधिकाऱयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिह्यात कोविडची साथ आटोक्यात आलेली नसताना अधिकाऱयांमधील संघर्षामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर कोविड केंद्रामध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा साठला आहे. तेथील कचऱयाची निर्गती लावण्यासाठी योग्य ती पावले उचलली गेली नाही. त्यामुळे तेथील रुग्ण अस्वच्छ वातावरणात राहत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. समाजमाध्यमांमध्ये कोविड केंद्राच्या दुरावस्थेविषयी मोठी चर्चा उपस्थित झाली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱयांनी गंभीर दखल घेतली.
आधीच तणावात असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना फैलावर घेण्यात आले. दूरध्वनीवरुन कारभाराचा हिशोब विचारण्यात आला. असा कारभार करणाऱयांवर कारवाईची भाषा झाली. महिला आरोग्य अधिकारी हे सर्व ऐकून घेत होत्या. बरेच बोलणे झाले. शेवटी बाईंनी सांगितले, दुरुस्तीसाठी योग्य ती तजवीज करण्यात येईल.
रात्री 11 वाजता झालेल्या या प्रकारानंतर आरोग्य विभागाच्या त्या अधिकारी बाईंनी खूप अस्वस्थता व्यक्त केली. आधीच तणाव त्यात वरिष्ठांकडून अशा शब्दात बोलणे हे योग्य नव्हे. हाताखालच्या लोकांकडून काम करुन घेण्यासाठी योग्य पध्दत वापरली पाहिले. तिचा अभाव असल्याची या महिला अधिकाऱयांच्या म्हणणे आहे. सध्याच्या वातावरणात तक्रार करणे शक्य नाही. बोलणे मात्र ऐकून घ्यावे लागते. तोंड दाबून बुक्यांचा मार असल्याची प्रतिक्रिया महिला अधिकाऱयांनी व्यक्त केली.









