प्रतिनिधी/ म्हापसा
गणेश चतुर्थी हा गोमंतकीय जनतेचा उत्साहाचा व आनंदाचा सोहळा आहे. गोमंतकीय जनता हा सण उत्साहात साजरा करताना मागचा पुढचा विचार न करता मुक्तहस्ते पैशांची उधळण करीत असते. पण यंदाच्या गणेशोत्सवावर कोविड महामारीचे सावट आल्यामुळे म्हापसा बाजारपेठेला आर्थिक मंदी आली आहे. दरवर्षी गणेशचतुर्थीला 8-10 दिवस शिल्लक असताना ग्राहकांची झुंबड दिसायची. म्हापसा बाजारपेठेतील सर्व रस्ते लोकांच्या गर्दीने फुलून निघायचे पण यंदा कोविड महामारीमुळे ग्राहक म्हापसा बाजारपेठेत खरेदीसाठी येण्याचे टाळत होते.
रस्त्यावर हंगामी तत्त्वावर दुकाने थाटण्यास म्हापसा पालिकेने परवानगी दिलेली नाही. पालिकेने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने बाजारात गर्दी होऊ नये या दृष्टीने चतुर्थीनिमित्त होणाऱया खरेदी विक्रीबाबत बाजारपेठेचे नियोजन केले आहे. कपडय़ांच्या दुकानात अजूनही दरवर्षीप्रमाणे ग्राहकवर्ग पुरेशा संख्येने खरेदीसाठी आला नाही. या दुकानमालकांचे म्हणणे आहे की, गतवर्षीच्या तुलनेत केवळ 30 ते 40 टक्के ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. दरवर्षी गणेशचतुर्थीनिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची मोठी मागणी असायची, पण यंदा आर्थिक मंदीमुळे ग्राहक आवश्यक आहे तेवढेच खरेदी करतात. इतर गोष्टींकडे ते लक्षच देत नाहीत. तयार कपडय़ांच्या दुकानातसुद्धा ग्राहक नाहीत. लहान मुलांसाठी लोक दरवर्षी चतुर्थीनिमित्त नवीन रेडीमेड कपडे घेत असत. पण यंदा रेडीमेड कपडय़ांनासुद्धा ग्राहक मिळत नाहीत.
भाडेपट्टीवर दुकाने घेतलेल्या दुकानधारकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यंदाची गणेशचतुर्थी आम्हाला फायदा करून देणारी नाही. फक्त कामगारवर्गांचा पगार, सरकारचे विविध कर व आमचा उदरनिर्वाह होण्यापुरतीच विक्री होत आहे. फक्त चतुर्थीसाठीच्या आवश्यक साहित्याची खरेदी सूरू आहे. दागिने खरेदीही अगदी अल्प प्रमाणात होत आहे.
भेटवस्तु खरेदीवर मर्यादा
गणेश चतुर्थीनिमित्त नवीन भांडय़ांची खरेदी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात केली जात होती. गणेशोत्सवात पाच दिवस गणपतीचे पूजन असेल तर श्री सत्यनारायण महापूजा करण्याचा गोव्यातील कित्येक घरांमध्ये रीतिरिवाज असल्यामुळे पूजेच्या यजमानांना भांडय़ाच्या अथवा कपडय़ांच्या स्वरुपात भेटवस्तू दिल्या जात असत. पण यंदा बहुतांश लोकांच्या घरी दीड दिवस गणेशोत्सव साजरा होणार असल्याने विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. तसेच सरकारने जरी केलेल्या नियमांमुळे कुणी कोणाच्या घरी सहसा जाणार नसल्यामुळे लोकांनी भांडी किंवा कपडे इत्यादींची खरेदी केलीच नाही. त्यामुळे त्या व्यापाऱयांना ग्राहकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे आर्थिक फटका बसला आहे.









