बीजिंग / वृत्तसंस्था
चीनमध्ये झालेल्या एका कोळसा खाण दुर्घटनेत 14 कामगारांचा बळी गेल्याची माहिती रविवारी प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली. मदत व बचाव मोहीम पूर्ण झाल्यानंतर सर्व कामगारांचे मृतदेह हाती लागल्याचे जाहीर करण्यात आले. गाईझोऊ प्रांतातील सान्हे शुंझून कोळसा खाणीत ही दुर्घटना घडली होती. खाणीच्या मुख्य गेटपासून घटनास्थळ जवळपास 3 किलोमीटर अंतरावर असल्याने मदत व बचावकार्यात बऱयाच अडचणींचा सामना करावा लागला. तरीही प्रशासनाच्या देखरेखीखाली व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती. चीनमध्ये अशाप्रकारच्या घटना वारंवार घडताना दिसतात. खोदकामासाठी करावे लागणारे स्फोट आणि गॅस गळतीमुळे अशाप्रकारच्या दुर्घटना चीनमध्ये ठराविक अंतराने घडतात.









