आठवडा बाजाराची परंपरा टिकून, हातमाग लुप्त
दहा पटीने विस्तार, उद्योग,शिक्षण नगरी, बाजारपेठ अशी ओळख निर्माण झाली
वारणानगर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात आज सुमारे बेचाळीस हजारावर अधिक लोकसंख्या असलेले पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक मोठे गांव असलेले कोडोली सन १८८१ मध्ये देखील भरभराटीचे (सुख समृध्द) असलेले गांव होते. त्यावेळपासून दर गुरुवारी असणारा कोडोलीचा आठवडा बाजार आजही टिकून आहे. बदलत्या काळाच्या ओघात येथील हातमाग व्यवसाय तेवढा लुप्त झाला आहे.
कोडोलीची महती सांगणारा एक छापील पुरावा सापडला आहे. त्यामध्ये पन्हाळा पेट्यात कोल्हापूरच्या उत्तरेस १४ मैलांवर, वारणेच्या खोऱ्यात वारणेपासून (नदी) १ (दीड) मैलावर कोडोली हे भरमराटीत असलेला गाव आहे. सन १८८१ साली येथील लोकसंख्या ४९४२ होती. आज ग्रामपंचायतीच्या आकडेवारीनुसार ४२,७५० म्हणजे दहापट वाढ झाली आहे. घरे १००० होती. पैकी १०० दुमजली, ६०० कौलारू आणि ३०० गवती घरे होती. आज पक्की घरे ७६६४ व कच्ची घरे १९१६ आहेत. घरामध्ये देखील दहा पट वाढ झाली आहे.
येथील लोक मुख्यत्वे कुणबी असून भात, ऊस, हळद, विड्याची पाने आणि मिरच्या हे जिन्नस सुमारे २०,००० रुपये किंमतीचे पिकवितात असा स्पष्ट उल्लेख असून कोडोलीस एकूण जमीन २२३६ हेक्टर २३ आर असून शेतीसाठी २०१२ हेक्टर ७८ आर वापर आहे. विड्याच्या पानाची, मिरची ही उत्पादने बंद झाली आहेत. शेतीगावचा परिसर १७ कि.मी. चा असून अतंर्गत रस्ते ४६ कि.मी. चे आहेत.
कोडोलीस १२५ कोष्टयांचे माग आहेत व त्यांपासून जाडे भरडे सुती कापड सुमारे २०,००० रुपये किंमतीचे उत्पन्न होते. दर गुरुवारी येथे बाजार भरतो व बाजारास १००० मनुष्य जमते यामध्ये धान्य, जाडे कपडे व सूत विकावयास येत होते. सद्या हा हातमाग व्यवसाय पूर्णता लुप्त झाला असून नव्या पिढीला याची माहिती देखील नाही.
एक धर्मशाळा आहे, पाच शिपायांचे एक छोटे चौकीचे पोलिस ठाणे होते. आज सुसज्ज पोलीस ठाणे कार्यरत असून अधिकारी कर्मचारी मिळून ५५ संख्या आहे, एक सरकारी शाळा असून तिथ ९० मुलगे व १० मुली शिकत होत्या. आज प्राथमिक शाळा ७, अंगणवाडी ३५, माध्यमिक शाळा ३, महाविद्यालये ३, इतर २ अशा शाळा महाविद्यालया बरोबरच इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच प्राथमिक शिक्षणापासून अभियांत्रिकी वैद्यकीय, व्यावसायीक अशा विविध प्रकारच्या शिक्षणातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
येथे १८० औरस चौरस फूट एक दत्तात्रयाचे मुख्य देऊळ आहे. निसर्गरम्य असणारे या क्षेत्रास त्यावेळी १०- १५ मैलांवरचे सुमारे १००० मनुष्य जमत होते. आजही जमतात परिसरातील जनतेचे हे श्रध्दास्थान आहे. दरसाल माघ शुद्ध पंचमीस जत्रा भरते ही परपंरा खंडीत झाली असून दर पौर्णिमेस महाप्रसाद असतो. एवढी माहिती सापडलेल्या दस्त ऐवजात मिळाली. त्या अनुषंगाने दहापटीने झालेला विस्तार सर्वाना विचार करायला लावणारा आहे.
ग्रामपंचायत, गावचावडी, सिटी सर्वे,पोष्ट ऑफिस, मंडल अधिकारी, कृषी मंडल अधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे, पशु – वैद्यकीय दवाखाना, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दोन, विद्युत वितरण, वजने – मापे, पाटबंधारे अशी सरकारी कार्यालये कोडोलीत कार्यरत आहेत, साखर कारखाना, दूध संघ, बँका, पतसंस्था, खाजगी बँका, माहिला बचत गट, मनुग्राफ, बिल्ट्यूब कंपनी अशा सुमारे २१७ संस्था कार्यरत असून बाझार, किराणा मालाची दुकाने, कापड, कृषी, औषध दुकाने, सराफ, मटन व भाजी मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीक विक्री व दुरूस्ती दुकाने, गाड्याचे शोरूम, मोबाईलची दुकाने या सह विविध प्रकारच्या आवशक सर्वच खरेदी विक्रीची हजारो दुकानानी बाजारपेठ निर्माण झाली असून १४० वर्षापूर्वीही आणि आजही कोडोली समृद्ध व भरभराटीची आहे.









