माजी खासदार धनंजय महाडिक यांचा पुढाकार, लहान मुलांसाठी 20 बेड राखीव,औषधोपचारासह नाष्ट-भोजन मोफत
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून हॉकी स्टेडियम परिसरात 120 ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोविड सेंटर लवकरच सुरु होत आहे. यासाठी स्टेडियम समोरील महापालिकेच्या पाच मजली इमारतीची माजी खासदार महाडिक यांनी पाहणी केली. येथे लहान मुलांसाठी 20 बेड राखीव असणार आहेत. तर रुग्णांना औषधोपचारासह नाष्टा-जेवण मोफत दिले जाणार आहे.
जिल्हयातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड मिळणे मुश्कील बनले आहे. रुग्णंच्या नातेवाईकांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. अशा गंभीर परिस्थितीत माजी खासदार धनंजय महाडिक आणि परिवाराच्या पुढाकारातून आणि महापालिकेच्या सहकार्याने हॉकी स्टेडियम समोर सुसज्ज कोविड सेंटर लवकरच कार्यान्वीत केले जाणार आहे. हॉकी स्टेडियम समोर महापालिकेच्या ताब्यातील 5 मजली नवी इमारत सेंटरसाठी उपयोगात आणली जाणार आहे. सोमवारी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी, या इमारतीची पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक सत्यजीत कदम, विजय सुर्यवंशी, किरण नकाते, संग्राम निकम, महेश वासुदेव, अमृत शहा, शिवप्रसाद घोडके, मनोज नलवडे उपस्थित होते.
ऑक्सिजनसह पाच व्हेंटीलेटर बेड
कोविड सेंटरमधील सर्व 120 बेड ऑक्सिजनचे असणार आहेत. त्याचबरोबर 5 बेड व्हेंटीलेटरचे असणार आहेत. तसेच 20 बेड लहान मुलांसाठी राखीव असणार आहेत. विनाखंड ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सेंटरमध्ये जंम्बो डÎुरा सिलेंडरचीही व्यवस्था केली जाणार आहे.
तज्ञ डॉक्टरांकडून उपचार
सेंटरमध्ये दाखल होणाऱया रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. तसेच लहान मुलांवरही बालरोग तज्ञांकडून उपचार केले जाणार आहेत. भाजप-ताराराणी आघाडीचे सहकार्य आणि महाडिक परिवाराच्या पुढाकारातुन येत्या आठवडÎात हे सेंटर कार्यान्वीत केले जाणार आहेत.
निवडणूक किंवा सत्ता यांचा संबंध समाजकारणाशी असत नाही. मनापासून काम करण्याची इच्छा आणि जनतेबद्दल आत्मियता असणारा माणूस स्वस्थ बसत नाही. या भावनेतूनच जिल्ह्यातील कोरोनाची गंभीर बनलेली परिस्थिती पाहता हे कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय महाडिक परिवाराने घेतला आहे. – धनंजय महाडिक, माजी खासदार