प्रतिनिधी / हातकणंगले
हातकणंगले शहरामध्ये खाजगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाचाच कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पालकांच्यात घबराट निर्माण झाली आहे. बुधवारी एका माजी सरपंचाचा व त्याच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गुरुवारी त्याच्या कुटुंबातील सर्वांचे नमुने तपासण्यात आले. त्यानंतर कुटुंबातील उर्वरित पाच लोकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यातील एक व्यक्ती खाजगी क्लासेस घेत होती. या शिक्षकाचा कोरोना रिपोर्ट रात्री उशीरा आल्यानंतर पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सदर शिक्षकाचा क्लास ९ तारखेपर्यंत अनाधिकृतरित्या सुरू होता. तर अनेकांच्या घरी जाऊनही सदर शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत होता. यातील 12 विद्यार्थ्यांना आज होम कॉरंटाईन करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच त्याच्याकडे ४० ते ४५ विदयार्थी क्लाससाठी जात होते. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे पालक अक्षरशः हवालदिल झाले असून हातकणंगले आणि परिसरांत खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या काळात बंदी असतानाही शासन आदेशाचे उल्लंघन करून क्लास चालवणाऱ्या या शिक्षकाबाबत आता प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज शुक्रवारी हातकणंगले नगरपंचायत प्रशासनाने या शिक्षकाशी संपर्क साधून त्याच्या क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून ९ तारखेनंतर या शिक्षकाच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला. यात थेट संपर्कात आलेले 12 विद्यार्थी सापडले. ही शोधमोहीम करताना प्रशासनाच्या चांगलेच नाकीनऊ आले होते. तर शिक्षणाला जिवापेक्षा अधिक महत्त्व देणाऱ्या पालकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले होते. लॉकडाऊन असतानाही आपल्या पाल्याला घरी शिक्षक बोलून शिकवणी घेण्यास आग्रह करणारे पालक मात्र आता आपल्या पाल्याचा कोरोना रिपोर्ट काय येतो, याकडे डोळे लावून बसले आहेत.








