प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळत शनिवारी स्वातंत्र्यदिनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा झाला. त्यानंतर काही वेळातच पाचगाव येथील वृद्ध, त्यांची पत्नी अन् दोन सुना अशा चौघांनी सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. महिला पोलिसांनी सतर्कता अन् सावधानता पाळत त्यांना ताब्यात घेतले, पण आंदोलक महिलांच्या चिमुकल्यांमुळे वातावरण तणावपुर्ण बनले. दरम्यान, पाचगाव येथील जमिनीच्या वादातून स्थानिक प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याच्या रागातून, अंतीम निर्णयासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हय़ात शनिवारी 74 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग पाळत शासकीय ध्वजारोहण झाले. त्यानंतर अर्ध्या तासात पाचगाव येथील भालकर चौघांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सोबत आणलेल्या कॅनमधील रॉकेल ओतून घेतले, हा प्रकार पाहताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. वृद्ध, त्याची पत्नी अन् दोन सुना अशा चौघांना पोलीस ताब्यात घेत असताना सोबत आलेल्या लहान मुलांनी भीतीने आरडाओरड केली. त्यांच्या रडण्याने वातावरण तणावपुर्ण बनले. आंदोलनावेळी पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात होते. दरम्यान, आंदोलकांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दुपारी त्यांना घरी सोडण्यात आले.
आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील पाचगाव येथे पाचगाव रोडवर डिव्हीजन सर्व्हे क्र. 3 आहे. येथील एकाच प्लॉटच्या सातबारा उतार्यावर तिघांची नावे नोंद आहेत. यासंदर्भात न्यायासाठी आंदोलक कुटुंबाने तलाठी, ग्रामपंचायत, करवीर तहसील आणि प्रांत कार्यालयापर्यत दाद मागितली. तसेच हा बेकायदेशीर उतारा रद्द करावा, अशी मागणी केली. वारंवार मागणी करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या जागेत सध्या एका समाजाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याला, तलाठी, स्थानिक प्रशासनाचा छुपा पांठींबा आहे. जिल्हाधिकार्यांनी या प्रश्नी लक्ष घालून न्याय द्यावा, यासाठी स्वातंत्र्यदिनी हे आंदोलन केल्याची माहिती आंदोलक कुटुंबियांनी दिली.
दरम्यान, तक्रारदार यशवंत गणपती भालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पाचगाव येथे रिसनं 3, हिस्सा प्लॉट 151 ही मिळकत आहे. त्यांच्या शेजारील अतिक्रमणासंदर्भात तक्रार आहे. त्यांच्या प्लॉटशी निगडीत बोगस, बनावट सातबारा उतारा तयार केल्याचे प्रकरण पुढे आली. त्याच्या चौकशीची मागणी भालकर यांनी केली. यासंदर्भात प्रत्येक टप्प्यावर चौकशी झाली अन् जिल्हाधिकाऱयांनी प्रांतांना योग्य तो निर्णय देण्याचे पत्र दिले. करवीर तहसीलदारांच्या अहवालातही चुकीचा सातबारा असल्याचे नमूद केले आहे. मंडलाधिकाऱयांचा अहवाल आहे. प्रांतांनी 15 जून 2019 रोजी मुळ प्रस्ताव, सातबारा रद्द केल्याचे स्पष्ट केले आहे. पण यासंदर्भात अंतीम निर्णयाला वेळ लागत आहे. विरोधकांकडून आम्हाला त्रास दिला जात आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा देणारे निवेदन प्रशासनाला दिले होते.
स्वातंत्र्यदिनी शनिवारी सकाळी 9 वाजता आंदोलक यशवंत भालकर जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. त्यांच्यापाठोपाठ त्यांची पत्नी इंदुबाई आणि सुना संगीता शिवाजी भालकर, स्वाती संभाजी भालकर आणि कांचन उमाजी भालकर आपल्या मुलांसह आल्या. यशवंत भालकर 75 वर्षांचे आहेत. त्यांनी ध्वजारोहण सोहळा संपताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. पोलिसांनी अडवण्यापुर्वी त्यांनी सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेतले, पाठोपाठ त्यांची पत्नी अन् दोन सुनांनीही सोबत आणलेल्या कॅनमधील रॉकेल ओतून घेतले. महिला पोलिसांनी प्रसंगावधान राखत या तिघींनाही ताब्यात घेतले. शाहूपुरी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती भालकर कुटुंबियांनी दिली.









