तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्याचे निर्देश, पॉझिटीव्ही रेट घटल्याबद्दल आरोग्य विभागाचे अभिनंदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
करवीर तालुक्यातील परिते येथे स्त्री भ्रुणहत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये दोषी असणाऱयांवर कठोर कारवाई करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती सभेत करण्यात आला. संपूर्ण जिह्यात स्त्री भुणहत्येचे रॅकेट असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही सभेत करण्यात आली.
आरोग्य सभापती वंदना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभा पार पडली. जिह्यातील कोरोना पॉझिटीव्ही रेट 7 वरून 4.5 वर खाली आला आहे. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या योगदानातूनच कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे स्पष्ट करून सभेमध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. शासन निर्णयानुसार गरोदर मातांना कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. या लसीकरणाचा गर्भवती मातांवर कोणताही परिणाम होत होत नाही. याबाबत जिह्यातील लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्याचे आवाहन सभापती वंदना जाधव यांनी केले. संभाव्य तिसऱया लाटेमध्ये 1.25 लाख मुलांना कोविड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा अशा सूचनाही सभापती जाधव यांनी दिल्या. यावेळी आरोग्य समितीचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
तुरंबेतील आरोग्य पथक आडोली येथे होणार स्थलांतरीत
राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे नविन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. आडोली (वाकीघोल) हे तालुक्यातील दुर्गम गाव आहे. हा परिसर 6 हजार लोकवस्तीचा आहे. परंतू येथे कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तुरंबे येथील पथक आडोली येथे स्थलांतरीत करण्याचा सर्वानुमते ठराव करण्यात आला.









