आगीत सुमारे १६ लाखांचे नुकसान
सेनापती कापशी / प्रतिनिधी
येथील स्वामी चौकातील बाजीराव मारुती तेलवेकर यांच्या ‘कापशी बझार’ला मंगळवारी पहाटे आग लागली. या आगीत बझारमधील घरगुती वापरासाठीचे साहित्य, सर्व किराणा माल जळून खाक झाला आहे. या आगीत सुमारे १६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली सविस्तर माहिती अशी, येथील चौकात बाजीराव तेलवेकर यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये ‘कापशी बझार’ सुरु केला होता. यापूर्वीही त्यांचे येथेच किराणा मालाचे दुकान होते. सध्या लॉकडाउन असल्यामुळे बझार बंदच होता. मंगळवारी पहाटे बाळू शिंदे यांना जाग आल्यानंतर ते घराबाहेर आले असता त्यांना दरवाज्याच्या फटीतून काहीतरी जळत असल्याचे दिसले. शिंदे यांनी बझारचे मालक बाजीराव तेलवेकर यांना फोनवरुन याची कल्पना दिली. तेलवेकर ताबडतोब बझारकडे येवून शेटर उघडताच आतून आगीचा लोटच बाहेर आला.
दोन मजली इमारतीत सर्व घरगुती वापराचे साहित्य, किराणा माल आणि विशेष करुन खाण्याच्या तेलाने भरलेले डबे असल्याने आगीने प्रचंड रौद्र रुप धारण केले. बघता – बघता सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीच्या लोटांनी तापून इमारतीला केलेला गिलावाही पडू लागला आहे. दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी पहाटे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व मंडलिक कारखान्याचे अग्नीशमन घटनास्थळी मागवून घेण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली.
तरुणांची साहित्य वाचवण्यासाठी धडपड…
तत्पूर्वी बझारला लागलेली आटोक्यात आणण्यासाठी व बझारमधील माल वाचवण्यासाठी येथील उपसरपंच तुकाराम भारमल, अक्षय नाईक, अजय जाधव, दयानंद तेलवेकर, ओमकार शिंदे, अमोल डवरी, प्रकाश निर्मळे, बाळू शिंदे, शिवाजी शिंदे, सचिन यांच्यासह शर्तीचे प्रयत्न केले. पण आगीपुढे या तरुणांचे प्रयत्न आपुरे पडले. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे तेलवेकर यांना अर्थसाहाय्य असल्याने बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी येवून पंचनामा केला. यावेळी माजी सरपंच दत्तात्रय वालावलकर उपस्थित होते.









