जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, सीपीआरमध्ये खळबळ, वॉर्डमधील स्टाफकडेही विचारणा,
‘सीपीआर’मधील वरिष्ठांकडून सारवासारव, पीपीई कीट पुरवठा करणाऱ्यांकडेही चौकशी,
‘तरूण भारत’च्या वृत्ताने खळबळ, चौकशी सुरू
अन्य शासकीय हॉस्पिटल्संना ही कीट गेल्याची शक्यता
प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये सदोष पीपीई कीट दिसून आली आहेत. यातील काही कीटवर बुरशी साचली आहे. त्यामुळे त्यापासून स्टाफला धोका आहे का, याची चौकशी सुरू आहे. ‘तरुण भारत’मध्ये शुक्रवारी सदोष पीपीई कीटसंदर्भात आलेल्या वृत्ताने खळबळ उडाली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. शुक्रवारी या कीटसंदर्भात वॉर्डमधील स्टाफकडे विचारणा करण्यात आली. पीपीई कीट पुरवठा करणाऱ्या कंपनीकडेही प्रशासनाने विचारणा केली. पीपीई कीटसंदर्भात तज्ञ समितीने मात्र यावर सारवासारवीचा प्रयत्न केला आहे.
सीपीआरमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी वैद्यकीय स्टाफला पसर्नल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) कीट दिली आहेत. यातील काही कीट सदोष असल्याचे गुरुवारी वॉर्डमधील स्टाफने अधिष्ठात्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यासंदर्भात चर्चाही झाली, पण शुक्रवारी पीपीई कीट तपासणी समितीने यासंदर्भात सारवासारवीचाच प्रयत्न केला. वॉर्डमधील स्टाफकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली. यामुळे स्टाफ दबावाखाली आहे.
सीपीआरमधील सदोष पीपीई कीटची गंभीर दखल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतली आहे. सदोष पीपीई कीटमुळे वैद्यकीय स्टाफला त्रास होत असेल तर ते गंभीर आहे. त्यामुळे यासंदर्भात माहिती घेऊन चौकशी करण्याची सुचना त्यांनी सीपीआर प्रशासनाला दिली. त्यानंतर पीपीई कीटशी निगडीत समितीने सदोष कीटची पाहणी केली. यावेळी यातील काही कीटवर बुरशी बसल्याचे दिसून आले. वातावरणामुळे असे घडले असण्याची शक्यता संबंधितांनी व्यक्त केली. काही समिती सदस्यांनी वॉर्डमधील स्टाफची समजूत काढत याप्रकरणी सारवासारव केली.
अन्य शासकीय हॉस्पिटल्समध्येही सदोष कीटची शक्यता
सीपीआरमध्ये सदोष बुरशीजन्य पीपीई कीट दिसून आली आहेत. त्यामुळे संबंधित विभागाकडून जिल्ह्यातील अन्य उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, कोरोना केअर सेंटरनाही अशी सदोष कीट पाठवली गेली असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने चौकशी होण्याची मागणी वैद्यकीय वर्तुळातून केली जात आहे.
अधिष्ठात्यांकडून पीपीई कीट प्रकरणी खुलासा नाही
सदोष पीपीई कीटसंदर्भात शुक्रवारी चौकशी सुरू झाली. पण राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदकांत मस्के हे शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. ते दुपारी परत आले. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रात्री उशिरापर्यत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
सीपीआरला मिळालेली सदोष पीपीई कीट जिल्हा परिषदेकडून आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीपीई कीट पुरवठादारांकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली. सदोष कीटसंदर्भात आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी हात वर केले आहेत. त्यामुळे पीपीई कीटचा पुरवठा कोणत्या आरोग्य विभागाने केला, यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.
सीपीआरला आजपर्यत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पीपीई कीटसह वैद्यकीय साहित्याचा पुरवठा होत आहे. पीपीई कीटसंदर्भात तक्रारी आल्यानंतर शनिवारपासून संबंधित विभागाकडून होणारा हा पुरवठा कमी होणार आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने पीपीई कीट खरेदीसंदर्भात निविदा काढल्या आहेत. त्यामुळे लवकरच पीपीई कीटही वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.