सोनाळी व सावर्डे बुद्रुकच्या शेकडो महिलांचा मुरगूड पोलीस ठाण्यापुढे ठिय्या
मुरगूड / वार्ताहर
मयत वरदचे जन्मगाव सोनाळी आणि आजोळ सावर्डे बुद्रुक येथील शेकडो महिलांनी आज मुरगूड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. आरोपी स्वतःला गुन्ह्यातून सोडवण्यासाठी मयत वरदच्या आईवर खोटेनाटे आरोप करून तपासाची दिशा बदलली जात आहे. तपास कामाची दिशाभूल करणाऱ्या आरोपीची उलटतपासणी करुन वरदचा मारेकरी आणि त्याच्या पाठीराख्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. अशी जोरदार मागणी या महिलांनी केली.
तब्बल चार तासाहून अधिक काळ ठिय्या मारून बसलेल्या महिलांना अखेर माजी सरपंच सत्यजित पाटील यांनी या प्रकरणी कायदा हातात न घेता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी साक्षी पुराव्यानिशी पोलिसांच्या पाठीशी खंबीर राहूया असे आवाहन करून घरी परतण्याचे कळकळीचे आवाहन केल्यानंतर महिलांनी ठिय्या सोडून घरची वाट धरली.
चार दिवस बेपत्ता असलेल्या वरद रवींद्र पाटील (वय 7 वर्षे) रा. सोनाळी, ता. कागल या बालकाचा मृतदेह सावर्डे बुद्रुक परिसरात शुक्रवारी सापडला. वरदच्या वडिलांचा मित्र दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य या गावातीलच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांने खून केल्याची कबुली दिली. स्वतःला पंधरा वर्षापासून मुल होत नसल्याच्या नैराश्यातून मारुतीने हा खून केला असल्याची माहिती पुढे येत आहे. गेले दोन दिवस सोशल मीडिया वरून नरबळीचा संशय व्यक्त केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.
आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन आज सकाळी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष विकास पाटील, दिग्वीजय पाटील, बी एम पाटील, देवानंद पाटील, रणजीत सुर्यवंशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुरगुड पोलिसांना दिले. तत्पूर्वी वेगाने तपास काम करून याप्रकरणी आरोपींला तातडीने अटक केल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे व तालुका प्रमुख अशोक पाटील यांनी मुरगूड पोलिसांचे ठाण्यात येऊन पोलिसांचे अभिनंदन केले. याशिवाय सोनाळी ग्रामपंचायतीच्यावतीने देखील फास्टट्रॅक कोर्टामध्ये सदर खटला चालवावा अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. अन्य संस्था संघटनांनीही या प्रकरणी न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपाधिक्षक आर. आर. पाटील यांच्यासह मुरगूड पोलिस ठाण्याचे स.पो.नि. विकास बडवे आणि किशोर कुमार खाडे यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याचे पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे व आवाहन केले. पण नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
Previous Article”…तर तालिबान्यांना सडेतोड उत्तर देऊ” – जो बायडेन
Next Article शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार तयार : मुख्यमंत्री









