बहिण भावास अटक
६४ हजाराच्या दारुसह सव्वा सात लाखाचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील महादेवीनगररीमध्ये एक महिला गोवा बनावटीच्या देशी-विदेशी मद्याचा साठा करुन, त्याची विक्री करत असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरुन संबंधीत त्या महिलेच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना तवेरा आणि टेम्पोतून आणलेले गोवा बनावटीची देशी-विदेशी दारु उतरुन घरात साठा करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गोवा बनावटीची दारुसह वाहतूक करणारी तवेरा आणि टेम्पो ही वाहने जप्त केली. तसेच पोलिसांनी दारु तस्करी करणारी महिला शिवानी युवराज कुरणे ( वय २८, रा. खंडोबा तालमी जवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर ) आणि तिचा भाऊ ओंकार राजेंद्र साळोखे ( वय २९, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर ) या दोघा बहिण भावाला अटक केली. ही कारवाई जुना राजवाडा पोलिसांनी केली.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना शुक्रवारी दुपारी बातमीदार मार्फत साळोखे नगर येथे एक महिला गोवा बनावटीच्या दारुची विक्री करीत असल्याबाबतची माहिती मिळाली. तसेच दुपारी या महिलेच्या राहत्या घरी गोवा बनावटीची देशी विदेशीचे बॉक्स उतरुन घेण्यात येणार असल्याबाबतचे समजले. त्यावरुन पोलीस ठाण्याचा गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. त्यावरुन या ठिकाणी छापा टाकला असता एका तवेरा आणि टेम्पोतून आणलेले गोवा बनावटीची दारु उतरून घरात साठा करत असल्याचे पोलीसांना आढळून आले. पोलीसांनी दारुची वाहतूक करणारी तवेरा आणि टेम्पो ही दोन वाहने आणि ६४ हजाराची गोवा बनावटीची देशी-विदेशी दारु जप्त केली. या जप्त केलेल्या दारुमध्ये स्टॅगी ग्रीन ब्लेंडेड, मॅगडॉल, रॉयल स्टॅग, इंपिरियल ब्लु या कंपनीच्या व्हिस्की दारुचा समावेश आहे.









