प्रतिनिधी / गारगोटी
भुदरगड तालुक्यातील सालपेवाडी येथील दत्तात्रय विठ्ठल गोरे या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना आज दि. १२ मार्च रोजी सकाळी घडली. गोरे यांना उपचारासाठी गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज पहाटे एक गवा सालपेवाडी जवळच्या उसाच्या शेतात बसून होता. याठिकाणी बिद्री कारखान्याची ऊसतोड सुरू होती. ऊसतोड करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना गवा दिसल्यानंतर त्याला घालवण्यासाठी आरडाओरडा केला. दरम्यान, गवा उठून शेतकऱ्यांच्या दिशेने धावू लागला. प्रथम तो बांधावरून खाली उतरला व त्याच्या पुढे आलेल्या शेतकऱ्याकडे वळला यावेळी हा शेतकरी जमिनीवर आडवा झोपला. त्याला सोडून गव्याने दत्तात्रय गोरे यांच्या दिशेने धाव घेतली. गोरे यांना पाठीमागून जोराने धडक मारली असता गोरे तोंडावर पडले व रक्तबंबाळ झाले.
जखमी शेतकऱ्यावर गारगोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. डॉक्टर मिलिंद कदम यांनी त्यांची तपासणी केली. गोरे यांच्या पाठीवर गव्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या छातीच्या बरगड्या फ्रेंक्चर झाल्या असाव्यात असे सांगण्यात आले. त्यांच्यावर पुढील उपचार कोल्हापूरात करण्यात येणार आहे.
यावेळी सालपेवाडी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. याबाबत पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आणि काही शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार हा गवा मादी असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तो सुस्त झाला होता व उसाच्या फडात विश्रांती घेत होता. लोकांच्या दंग्यामुळे तो बिथरला व शेतकऱ्यांच्या मागे लागला असावा, असा तर्क व्यक्त केला जात आहे.









