सत्ताधारी महाडिक, पी. एन. गटात अस्वस्थता
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या तातडीच्या बैठकीकडे तब्बल सात संचालकांनी पाठ फिरवली. त्यामुळे सत्ताधारी गटात अस्वस्थता होती. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात सायंकाळी पाच वाजता ही बैठक बोलावली होती. यावेळी अनुपस्थित संचालकांच्या भूमिकेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. ते सोबत आले तर ठीक नाहीतर प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देऊन ताकदीने निवडणूक लढवुया असा निर्धार केला.
आठ दिवसापासून जिल्ह्यात गोकुळची हवा अधिकच तापू लागली आहे. ३५ वर्षापासून एक हाती सत्ता असलेल्या महाडिक आघाडीला धक्का देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी सत्ताधारी आघाडीतही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ठराव जमा करताना तीन संचालकांनी अप्रत्यक्षरित्या बंड पुकारल्याने सत्ताधारी आघाडीची कोंडी झाली. त्यातच आता निवडणूक जशजशी जवळ येवू लागली तसे सत्ताधारी आघाडीला धक्के बसू लागले आहेत. शुक्रवारी आणखी एक जबर धक्का बसला आणखी चार संचालकांनी ताराबाई पार्क येथील बैठकीस येण्याचे टाळले. १९ पैकी १२ संचालक उपस्थित होते.
या संचालकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नेत्यांनी तालुकानिहाय कानोसा घेतला. प्रत्येक संचालकांकडे किती ठराव आहेत. आज दांडी मारलेले संचालक सोबत नाही आले तर काय होईल, त्यांना मानणारे ठरावधारक किती याची चाचपणी केल्याचे समजते. सायंकाळी पाच ते सव्वा सहा वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. बैठकीला चेअरमन रविंद्र आपटे, माजी चेअरमन अरुण नरके, रणजीतसिंह पाटील, विश्वास जाधव, दीपक पाटील, बाळासाहेब खाडे, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, सत्यजीत पाटील, धैर्यशील देसाई, अमरिष घाटगे, बाबा देसाई उपस्थित होते.
| या संचालकांनी फिरवली पाठ विश्वास पाटील, अरुणकुमार डोंगळे, राजेश पाटील, संस्थापक आनंदराव पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, अनुराधा पाटील, विलास कांबळे, रामराजे कुपेकर |
| केवळ प्राथमिक चर्चा झाली या बैठकीत विशेष काही नव्हते नियमित चर्चेसाठी बसलो होता. निवडणुकीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. चार दिवसात दिशा स्पष्ट करु, असे बैठकीतून बाहेर पडताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. |









