कोल्हापूरमधील ‘या’ रुग्णालयात केली जातेय अजब मागणी
नातेवाईकांकडेच पीपीई किट आणण्याची केली मागणी
वार्ताहर / उदगाव
उदगाव ता. शिरोळ येथील शासकीय कुंजवन कोविड सेंटरमध्ये मृतदेह रॅपींग व रुग्णवाहिकेसाठी सहा हजार रुपये द्या मगच मृतदेह न्या अशी अजब मागणी येथील कर्मचाऱ्यांनी केल्याने नातेवाईकांनी कुंजवन सेंटरसमोर ठिय्या मारला. याबाबत तत्काळ जि. प. समाज कल्याण सभापती स्वाती सासणे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सासणे यांनी तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी यांना याबाबत जाब विचारल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. या घटनेनंतर तालुक्यात आरोग्य विभागावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
शिरोळ तालुक्यातील चिंचवाड येथील रामचंद्र राहू ठोमके यांचे कोरोनाने रविवारी रात्री नऊच्या सुमारास कुंजवन सेंटरमध्ये निधन झाले. नातेवाईकांना ही बातमी कळल्यानंतर महादेव सातपुते, सचिन जाधव, तुकाराम ठोमके, चंद्रकांत पाटील हे कोरोना सेंटरमध्ये पोचले. मात्र यावेळी कर्मचाऱ्यांनी रॅपींग व रुग्णवाहिकेसाठी सहा हजार रुपये द्या तसेच पीपीए किट संपले असून ते घेऊन या असे सांगितले. त्यांनतर या प्रकाराची माहिती चंद्रकांत पाटील यांनी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांना दिली तसेच यावेळी कुटुंबियांनी कोविड सेंटरच्या गेटवर ठिय्या मारला.
त्यांनतर घडलेल्या प्रकारचा जाब स्वाती सासणे यांनी तहसीलदार अपर्णा धूमाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी पी. एस दातार व गटविकास अधिकारी शंकर कविकते यांना विचारला व असा प्रकार शासकीय कोविड सेंटरमध्ये होत असला तर याच आवाज उठवू व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तक्रार दाखल करू असे सांगितले. त्यांनतर मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यात आला.









