सामाजिक संस्थांप्रमाणे नातेवाईकांनीही माणूसकी दाखवण्याची गरज
व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमधून 300 लोक कोरोनामुक्त
एक दिवसाच्या बाळापासून ते 103 वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
कोरोना संकटकाळात माणूसच माणसाला परका होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाबाधित व्यक्ती व कुटुंबापासून दूर राहण्याचे प्रकार सर्रास आढळुन येत आहेत. अशा संकट समयी माणुसकीच्या आधाराची गरज असताना आपली जीवा-भावाची माणसही लांब जात असल्याने अनेकांची निराशा वाढत आहे. परंतू व्हाईट आर्मीचे जवान अशा रुग्णांना आधार देत आपुलकीचा हात पुढे करत आहेत. यातूनच नात्यांमधले नसले तरीही माणुसकीच्या नात्याने जोडली गेलेली माणसे येथे पाहायला मिळत आहेत. याच आधारवर अनेकांनी कोरोनासारख्या संकटाला हरवत पुन्हा घर जवळ केले आहे.
कोल्हापूर मेडीकल असोसिएशन, कोल्हापूर जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशन, निहा आणि निमा असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून व्हाईट आर्मीने जैन बोर्डींगमध्ये कोविड सेंटर उभारले आहे. येथे रुग्णांना ऑक्सिजन बेडसह अन्य सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यामुळेच एक दिवसाचे बाळासह माता आणि 103 वर्षांच्या आजींनीही कोरोनावर मात केली. येथे खेळीमेळीचे वातावरण असल्याने रुग्णांकडून समाधान व्यक्त होत आहे. व्हाईट आर्मीच्या कार्यातून कोल्हापूरकरांना माणुसकीचे दर्शन घडले आहे.
कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर पहिल्यांदा कोरोनासंदर्भात त्याच्या मनातील भीती दूर केली जाते. दररोज सकाळी प्राणायम, योगासन आणि लिंबू-मद, शहाळे, गरम पाणी, सकस नाष्टा आणि जेवन दिले जाते. येथे सिस्टर हिना यादवाड, सेल्वेना रुग्णांची सेवा करीत आहेत. तर व्हाईट आर्मीचे जवान प्रशांत शेंडे, विनायक भाट, सिध्देश पाटील, अरविंद लवटे हे योध्दे साफसफाईपासून ते सर्व सुविधा पुरवण्याचे काम करीत आहेत. तसेच कोरोनावर मात करून गेलेले रुग्ण पुन्हा दुसऱया रुग्णांची सेवा करण्यासाठी या कोविड सेंटरमध्ये येत आहेत.
सध्या मात्र कोणताही आजार झाला तर संशयाने पाहिले जात आहे.शेजाऱ्यांसह नातेवाईक, मित्र जीवाच्या भितीपोटी भेटायला जात नाहीत. एखादी व्यक्ती दगावली तरी संबंधीत कुटुंबाच्या सांत्वनासाठी जाण्यास कोणी धजावत नाही. परंतू व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांशी संवाद साधत माणूसकीच्या नात्याने त्यांना आधार दिला जात आहे. तसेच कोव्हिड सेंटरमध्ये बाळाच बारस, बरे होणाऱया रूग्णांचे अभिनंदन आदी उपक्रमातून रूग्णांना दिलासा मिळतोय. येथील आपुलकीच्या ओलाव्याने कोरोनावर मात करून जाणाऱया रूग्णांचे हृदय भरून येत आहे.
धीराने सामोरे जाण्याची गरज
व्हाईट आर्मिने ७० बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. यामध्ये ३०० लोकांनी उपचार घेतले आहेत. मृत्य व्यक्तींवर अंत्यसंस्कारही केले आहेत. कोरोना हा मानसिक आजार असल्याने धीराने सामोरे जाण्याची गरज आहे. समाजाने स्वत:ला डोळ्यासमोर ठेवून नियमांचे पालन करत एकमेकांना मदत करावी.
– अशोक रोकडे (अध्यक्ष : व्हाईट आर्मी संस्थापक)