आजपासून प्रक्रिया सुरु, सहकार विभागाने काढले आदेश
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनामुळे वर्षभर सातत्याने लांबणीवर टकाण्यात येत असलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला. ज्या टप्प्यावर निवडणुका थांबल्या आहेत. त्या टप्प्यापासून पुढे निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेश सहकार व पणन विभागाने मंगळवारी काढले. बुधवार ३ पासून निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्कंठता लागून राहिलेल्या जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा बँक, राजारामसह बाजर समिती, साखर कारखाने, कोजिमाशि, प्राथमिक शिक्षक, गर्व्हमेंट सर्व्हंट बँक, जिल्हा परिषद सोसायटीसह चार हजार संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीसाठी पहिल्यांदा सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ दिली होती. २७ जानेवारी २०२० ला तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर देशात कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा स्थगितीचा निर्णय घेण्यात आला. यावेळी काही संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती. मात्र आहे त्या टप्प्यावर स्थगिती दिली होती. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढूलागल्याने तब्बल चार वेळ तीन तीन महिन्यांसाठी कार्यकाल वाढवण्यात आला. १६ जानेवारीला शेवटची मुदतवाढ होती. ३१ मार्च पर्यंत निवडणुका लांबणिवर टाकण्यात आल्या. दरम्यानच्या काळात विधान परिषद, ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. तर मल्टीस्टेट बँका, साखर कारखाने आदी संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, हाच मुद्दा घेऊन राज्यातील काही सहकारी संस्थांनी न्यायालयात धाव घेतली होती. कोल्हापुरातील राजाराम कारखान्यानेही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर गोकुळ बचाव समितीनेही गोकुळची निवडणूक लकवकरात
लवकर घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात ज्योतिर्लिंग दूध संस्था, केर्ली तर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर १०- फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार होती. मात्र मंगळवारच्या शासन निर्णयाने उच्च न्यायालयातील निर्णयाला फारसे महत्व उरले नाही.









