कोरोना महामारीच्या काळात समुपदेशकांनी वाढविले रुग्णांचे मनोलब
कोरोनामुक्तीसाठी बजावली महत्वपूर्ण भूमिका
इतर आजाराप्रमाणेच कोरोना संसर्ग : लस येईपर्यंत काळजी घेणे गरजेचे
सीपीआरच्या धर्तीवर खासगी रुग्णालयातही समुपदेशकाची गरज
नंदकुमार तेली / कोल्हापूर
कोव्हिड -19 हा आजार इतर संसर्गजन्य आजाराप्रमाणेच असून रुग्णाशी नव्हे तर संसर्गाशी लढा द्यायचा आहे. आजूनही संसर्गाचा धोका न टळल्याने लस येईपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी घाबरुन न पॉझिटिव्ह विचाराने कोरोनावर मात केली पाहिजे. अशा प्रकारचा संवाद साधत समुपदेशकांनी रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. कोरोना महामारीच्या संकटात `मानसिक आधार’ देण्याची मोलाची भूमिका समुपदेशकांनी बजावली आहे.
समुपदेशनाव्दारे वाढविले रुग्णांचे मनोबल
कोरोना काळात सीपीआर कोव्हिड केअर सेंटर जिल्हा व शहरातील रुग्णांसाठी आधारवड ठरले. कोरोनावर ठोस औषध तयार न झाल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या मनात आजाराबद्दल भिती निर्माण झाली होती. या रुग्णांना वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्ससह नर्सिंग स्टाफ, सफाई कर्मचारी आदी वैद्यकीय पथकाने जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देण्यात योगदान दिले आहे. तर वैद्यकीय पथकाच्या बरोबरीने समुपदेशकांनी रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांना मानसिक आधार देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. रुग्ण उपचार घेत असताना त्यांच्या आजारविषयी मनातील भिती घालविणे, माहिती देणे, घरी गेल्यानंतरही काय काळजी घ्यायची, व्यायाम, आहार कोणता आदीविषयी माहिती व मार्गदर्शन केले.
खासगी रुग्णालयात समुपदेशक नेमण्याची गरज
सीपीआरमधील मानसोपचार विभागप्रमुख व मानसोपचार तज्ञ डॉ.पवन खोत, डॉ.विशाल पाटील, डॉ.स्नेहा हर्षे यांच्या मार्गदर्शनाखाली कौन्सिलर महेश्वर मंगरुळे यांच्यासह कोळी, सचिन पाटील, विजया पाटील, आफरीन जमादार आदी पाच जणांच्या पथकाने गेल्या सहा महिन्यांपासून न थकता अविरत रुग्णांचे कौन्सिलिंगव्दारे मनोबल वाढविण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. याचप्रमाणे खासगी रुग्णालयांनी रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी तज्ञ समुपदेशक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून जोर धरत आहे.
ढासळलेल्या मानसिकलेला दिला आधार :- समुपदेशक महेश्वरी संदीप मंगरुळे (राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर)
सध्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, 20 सप्टेंबरपर्यंत 9 हजार 517 विविध विभागात उपचारासाठी दाखल झालेले तर 517 प्लाझ्मा थेरीपीचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना समुपदेशनाव्दारे मानसिक आधार दिला आहे. इतर आजाराप्रमाणे कोरोना रुग्णाजवळ नातेवाईक नसल्यामुळे रुग्ण व नोतवाईकही घाबरुन जात होते. रुग्ण व नातेवाईक यांच्यातील दुवा म्हणून समुपदेशकांनी काम केले. प्रत्येक वॉर्डमध्ये 20 ते 25 रुग्णांना ग्रुप कौन्सिलिंग, त्यांच्या नातेवाईकांशी फोनवरून कौन्सिलिंग करुन रुग्ण व नातेवाईकांचे मनोबल वाढवून ढासळलेल्या मानसिकतेला आधार दिला.









