सत्ताधारी-विरोधकांनी विचार करण्याची वेळ
विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी-विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आले. या सभेनंतर निवडणुकीतच्या कुरुक्षेत्रावरच थेट भेट होणार असल्याने भविष्यात गोकुळच्या राजकारणाचा पिक्चर कसा असू शकतो, याचा जणू टेलर दोन्ही बाजुनी प्रसारित केला. पण तुमचं राजकारण सुरु राहू दे, तुमच्या सत्ताकारणात गोकुळ ‘ब्रँड’चा नावलैकीकी कायम राहील, त्याला धक्का पोहचणार नाही. याचं भान नेत्यांनी ठेवणे आवश्यक आहे. नाही तर दूधपंढरी गुजरातमध्ये बस्तान बसण्या आगोदरच गोकुळ ब्रँडचा ‘बस’ उद्धवस्त होण्याची भीती आहे.
गवगवा होण्यापेक्षा बदनामीच अधिक
स्वर्गीय आनंदाराव पाटील चुयेकर यांनी मोठ्या हिंमतीने दूध संघाची उभारणी केली. त्यांच्या बरोबरीने काहींनी संघाचा लौकिक वाढवला आहे. 58 वर्षात अनेक टप्पे पार करीत गोकुळचा ब्रँड देश आणि देशाच्याबाहेर पोहचला. दूध व्यवसायत काही नवीन बदल येणार असतील तर आजही त्याची सुरवात गोकुळमध्येच होते. त्यानंतर त्याचेच अनुकरण देशातील अन्य खासगी, सहकारी संघात केले जाते. हा गोकुळचा नावलौकीक आहे. कोल्हापूरची अस्मिता म्हणून गोकुळकडे पाहिले जाते. मात्र अलिकडच्या काळात गोकुळ वर्तुळात सुरु असलेल्या सत्ताकारणात गोकुळ ब्रँडचा गवगवा होण्यापेक्षा अधिक बदनाम कसा होईल या दिशेनेच पावले पडताना दिसत आहे.
पुन्हा जुन्या वादाचीच पुनरावृत्ती
गत निवडणुकीपासून पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात रणकंदन सुरु आहे. मल्टिस्टेटवरुन संघर्षाने हीमनगाचे टोक गाठले. सत्ताधारी गटाने यावरा तात्पुरता पडदा टकाण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या दोन्ही गटातील संघर्षाला मात्र अधुनमधून उकळी फुटत असते. अन्य काही संस्थांमध्ये दोन्ही गट आहेत मात्र गोकुळमध्येच संघर्षाचे टोक का गाठले जाते याचे अंग आजही सर्वसामान्य दूध उत्पादक उमजलेले नाही. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही पुन्हा याचीच पुनरावृत्ती दिसून आली. यावेळी नेते नव्हते मात्र कर्यकर्ते भिडले. इतकाच काय तो बदल. सभेपूर्वी दोन्ही बाजुनी सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची सोडवणूक होईल, या अपेक्षेने दूध उत्पादक सभासदांनी हजेरी लावली होती. मात्र पहिल्याच विषयावरुन गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. व्यासपीठावरुन आणि खालून सभा चालवण्याचे आवाहन प्रतिआव्हान करण्यात येत होते. मात्र सभागृहात ऐकण्याची मानसिकता नव्हती. इतिवृत्तवर सभा अडकली तरीही 45 मिनिटे सभागृह सुरु होते. या 45 मिनिटात विषय पत्रिका मंजूर झाली, पण गोकुळचे भविष्यातील प्रश्न येणाऱया अडचणी, आव्हाने याविषयवर चर्चा दोन्ही बाजुनी ना मुद्दा उपस्थित केला ना सूचवण्यात आले. यामुळे सर्वसाधरण सभेचा मूळ हेतूच बाजुला पडला. एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठीच सभा घ्यायच्या असतात काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
अडचणी समजून घेणार कोण?
गोकुळ समोर भविष्यात मोठी आव्हाने असणार आहेत. काळासोबत न राहिल्यास अनेक अडचणींना समोरे जावे लागणार आहे. वीस लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्यासाठी व्याप्ती वाढवण्यात आली. काळाबरोबर राहिले पाहिजे स्पर्धेत टिकण्यासाठी हे आवश्यकही आहे. आता त्या यंत्रणेचा वापर होणे अवश्यक आहे. त्यासाठी काय नियोजन केले पाहिजे. शेजारील कर्नाटकर राज्यातून दूध संकलनाचे प्रयत्न आहेत. मात्र तेथे स्थानिक दूध संघांचे आवाहन आहे. दूध पंढरी गुजरातमध्ये धाडसाने पाऊल टाकले आहे. परंतु तेथे अमुल सारख्या बड्या पैलवानाचे आव्हान आहे. आपल्या कार्यक्षेत्रातही अमुल विस्तार करत आहे. स्थानिक बाजार पेठ अमुलकडे झुकु नये त्याला तोंड देण्यासाठी काय योजना आखता येतील ही संघाच्या हिताची चर्चा सर्वसाधारण सभेत होण्याची अपेक्षा होती, मात्र यातील एकाही प्रश्नाला कोणीही साधा स्पर्शही केला नाही. एकमेकांना पाण्यात बघण्यात शक्ती खर्च केली गेली. गोकुळमध्ये भविष्यात असे असेच सुरु राहिले तर एक दिवस कोल्हापूर जिल्ह्यात खरंच गोकुळ नावाचा ब्रँड होता ? अशी विचारण्याची वेळ येऊ शकते. गोकुळमध्ये सत्ताकारणासाठी सुरु असलेल्या राजकारणात याचाही विसर पडू नये इतकचं!









