कोरोना संकटात असेही शिवकार्य : शिवजयंतीचे औचित्य साधून कार्यकर्त्यांचा आरोग्यदायी उपक्रम
संग्राम काटकर / कोल्हापूर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हळूहळू माणसांच्या जीवावर बेतू लागला आहे. हॉस्पीटल्समध्ये बेड मिळत नसल्याने कोरोना बाधितांचे हालहाल होत आहेत. अशा महाभयानक परिस्थितीतून लोकांचे जीव वाचविण्यासाठी संयुक्त रविवार पेठेने कोरोना केअर सेंटर उभारण्याचा सामाजिक आणि आरोग्यदायी निर्णय घेतला आहे. फक्त निर्णय नव्हे तर कोरोना सेंटर उभारणीसाठी तब्बल 15 लाख रुपये खर्च पेलण्याची तयारीही केली आहे. या खर्चात सेंटरमध्ये 60 बेडची व्यवस्था करण्यापासून ते अगदी ऑक्सिजन आणि व्हेंटिलटरयुक्त बेडचीही सोय करण्याची मंडळाने तयारी ठेवली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून रविवार पेठेतील लहान, मोठी तब्बल 83 मंडळे एकत्रित येवून ऐतिहासिक बिंदू चौकात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करत आहेत. यामध्ये भोई गल्ली तालीम, सोनटक्के तालीम, सत्यनारायण तालीम, दिलबहार तालीम, पुलगल्ली तालीम, हनुमान तालीम यांच्यासह इतर मंडळांचे दीड ते दोन हजार कार्यकर्ते सहभागी होत असतात. यंदा मात्र कोरोनामुळे अगदी साधेपणाने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेऊन या कार्यकर्त्यांनी एक शिवकार्य आणि समाजाप्रती देणे लागतो या भावनेने कोरोना केअर सेंटर उभारण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. हे सेंटर उभारण्यासाठी पैशाची सोय केली आहेच, शिवाय सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱया कोरोना बाधिताला आपलेपणा वाटेल, अशी व्यवस्था केली जाणार आहे.
असे असेल सेंटर
कोरोना केअर सेंटरमध्ये रोजच्या रोज चहा, नाष्टा व जेवण देण्याबरोबरच योगा, हास्ययोगाचे ऑनलाईन वर्ग देखील भरवले जाणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या संसर्गामुळे नैराश्य आणि भितीच्या छायेत गेलेल्या बाधितांचे मन प्रफुल्लीत ठेवणारे सांस्कृतिक कार्यक्रम व समुपदेशनाचेही ऑनलाईनद्वारे आयोजन केले जाईल. केअर सेंटरमध्ये काय हवे नको याची व्यवस्था करण्यासाठी आपण स्वतःहून पुढे येऊ अशी तयारीही रविवार पेठेतील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दाखवली आहे. त्यामुळे आता लवकर मंडळाचे निवडक कार्यकर्ते सेंटरची जागा आणि त्यासाठी लागणारी परवानगी मिळवण्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनांशी संपर्क साधून सेंटरच्या उभारणीच्या कामात स्वतःला झोकून देणार आहेत.
जागेचा शोध सुरु…
एक शिवकार्य म्हणून हाती घेतलेले कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचे मिशन सत्यात उतरविण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या जागेचा शोध घेत आहेत. ज्यांना माणुसकीच्या नात्याने कोरोना सेंटर उभारणीसाठी आपली जागा द्यायची आहे, त्याचाही विचार करण्यात येणार आहे, असे संयुक्त रविवार पेठेचे अध्यक्ष प्रविण सोनवणे (मो-9850550555) यांनी `तरुण भारत’शी बोलताना सांगितले.