गटशिक्षण आधिकारी प्रविण फाटक
वार्ताहर / टोप
संभापूर ता. हातकणंगले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा संपूर्ण कायापालट करत अंतरबाह्य रूप बदलून इंटरनॅशनल स्कुलच्या तोडीस तोड शाळा बनविण्यासाठी संभापूर ग्रामस्थ करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन हातकणंगलेचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रवीण फाटक यांनी संभापूर शाळा भेटीवेळी बोलताना केले. यावेळी लोकनियुक्त सरपंच प्रकाश झिरंगे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना संभापुरचे सरपंच प्रकाश झिरंगे म्हणाले ग्रामपंचायत, लोकसहभाग व शिक्षक वर्गणीतून जिल्हा परिषद शाळेचे संपूर्ण रुपडेच बदलून टाकले आहे. संपूर्ण शाळा इमारत आकर्षक रंगसंगती साधत रंगकाम केले असून प्रवेशद्वार, पेव्हिंगब्लॉक तसेच सुंदर हिरवेगार लॉन, स्वच्छताग्रह, खेळाचे मैदान सपाटीकरण, हिरव्यागार वृक्षांचा ऑक्सिजन पार्क आदी सुविधा विकसित केल्या असून सर्व वर्गखोल्या डिजिटल केल्या आहेत.
यावेळी ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, केंद्र समन्वयक कृष्णात पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रवीण फाटक याचा सरपंच प्रकाश झिरंगे यांचे हस्ते तर शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र ठोकळ यांचा सत्कार मेहताब मणेर यांनी केला प्रास्ताविक सुशांत भंडारे यांनी केले तर आभार प्रकाश चौगुले यांनी मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सलिम महालदार, ग्रामसेविका आसमा मुल्लानी, बाजीराव मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.









