करवीर व राधानगरी भाजच्यावतीने मागण्यांचे निवेदन
प्रतिनिधी / भोगावती
भोगावती सहकारी साखर कारखाना यावर्षीच्या ऊसाची एफ.आर.पी.ची रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यात आणि त्यापैकी पहिला टप्पा ६० दिवसांनी व पुढील हप्ते दोन टप्प्यात देण्याचे शेतकऱ्यांच्या कडून लिहुन घेण्यात येणारे हमीपत्र त्वरित थांबवावे.यासह अन्य प्रमुख मागण्यांचे निवेदन मंगळवारी करवीर व राधानगरी तालुक्यातील भाजपाच्यावतीने कारखाना प्रशासनाकडे देण्यात आले.
भाजपाचे करवीर तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील व भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कारखान्याना प्रशासनाची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. कारखान्याचेवतीने उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर व कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी संचालक मंडळ उपस्थित होते. निवेदनात वार्षिक सर्व साधारण सभा, सभासद आणि ऊस उत्पादक सभासदांना विश्वासात न घेता प्रतिकिलो १० रुपये वाढविलेले साखरेचे दर कमी करावेत. सुमारे ३८ ते ४० महिने थकलेली सवलतीच्या दरातील सभासद साखर द्यावी.
कारखान्याच्या नवीन नोकरभरतीतील ५८० कर्मचाऱ्यांबाबत औद्योगिक न्यायालय व उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार पगार रक्कम फरकासह त्वरित अदा करावी. कारखान्याच्या कामगारांचे १० महिन्यांचे थकीत पगार द्यावेत. सन २०१७/१८ मधील गाळप ऊसापैकी ८० हजार टन ऊसाची घोषित केलेली रक्कम पुर्णता दिली आहे.मात्र उर्वरीत जवळपास ३ लाख मेट्रिक टनाची २०० रु प्रमाणे देणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी. आदी विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
याबाबत संचालक मंडळाने गांभीर्याने विचार करावा अन्यथा उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. शिष्टमंडळात डॉ. सुभाष जाधव, व्हि. टी. जाधव, सुरेश बावडेकर, संतोष कातीवले, संजय पोवार आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता. तर निवेदनावर, भाजपाचे राधानगरी तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, करवीर तालुका सरचिटणीस सतिश पाटील, बाजीराव लांबोरे, अशोक सरनोबत, बंडामामा भांदीगरे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.