वार्ताहर / उदगाव
उदगाव, चिंचवाड ता. शिरोळ परिसरामध्ये चिकनगुनिया व डेंग्यूचे रुग्णांचे प्रमाण वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाच्यावतीने तपासणी मोहीम सुरू आहे. ग्रामस्थांनीही याबाबत काळजी घेत खबरदारी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
महिन्याभरात डेंग्यूचे 7 तसेच 100 च्या आसपास चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. उदगाव परिसरामध्ये कोरोनाचे संकट अजून गेले नाही त्यातच भर म्हणून डेंग्यू चिकुनगुनियांने थैमान घातले आहे. गेल्या महिन्याभरात उदगांव येथे चिकुनगुनियांचे 100 हुन अधिक रुग्ण तर डेंग्यूचे 7 रुग्ण आढळून आले आहेत. तर चिंचवाड येथे 5 हुन अधिक जणांना चिकुनगुणियांची लागण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकांकडुन घरोघरी सर्व्हे करण्यात येत असून यावेळी उदगांव येथे 100 हुन अधिक घरात डेंग्यूच्या आळया आढळल्या आहेत. येथील महावीर कॉलनीसह गावभागात गेल्या महिन्यात चिकुनगुनियांचे 50 हुन अधिक रुग्ण सापडले होते.
या आठवडयात पुन्हा चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत या आठवड्यामध्ये येथील संत रोहीदासनगर, साखळे मळा व गावभाग येथे 7 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. चिंचवाड येथे पाच जणांना चिकुनगुनियांची लागण झाली आहे. त्यामुळे उदगांव परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे डेंग्यू व चिकुनगुनियांची लागण झाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य विभागाकडे दिली जात नसल्याने उपाययोजना करण्यात आरोग्य विभागाची मोठी अडचण झाली आहे. येथील आरोग्य उपकेंद्राच्यावतीने आशासेविका यांच्यासह आरोग्य सेवक व्ही.एस. पाटील, के.सी.चौगुले, ए.एस.वास्के, केतकी गवळी व जी.बी कुन्नुरे यांच्या पथकांकडुन गावात घरोघरी तपासणी करण्यात येत आहे.
ग्रामपंचातीने याबाबत त्वरित उपाययोजना राबविण्याची मागणी ग्रामस्थातुन होत आहे. या पार्श्वभूमीवर गावांमध्ये कोरडा दिन तसेच स्वच्छता मोहीम धूर फवारणी इत्यादी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे बोलले जात आहे. ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांनी ही जागृत राहत परिसरातील केरकचरा असलेल्या भागातील पाणी तसेच डासांच्या आळ्या निर्माण होणारे स्थान या भागात स्वच्छता करून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.









