दिपाली परीट यांची निवड निश्चित
प्रतिनिधी / शिरोळ
येथील पंचायत समितीच्या सभापती कविता चौगुले यांनी आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा 1 जून रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे दिला. येत्या 15 जून रोजी नूतन सभापतीपदाची निवड होणार आहे. याबाबत सभेच्या नोटीसाही सदस्यांना लागू करण्यात आल्या आहेत. मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाच्या सदस्या दिपाली संजय परीट यांची सभापतीपदी निवड होणार हे जवळजवळ निश्चित मानले जाते.
शिरोळ तालुका पंचायत समितीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी,व शिवसेना अशी महाविकास आघाडीची सत्ता आहे. विद्यमान सभापती कविता चौगुले यांची सहा ऑगस्ट 20 रोजी सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली होती. हे पद महिला सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे. विद्यमान सभापती चौगुले या शिवसेनेच्या सदस्या असुन आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे त्यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या महा विकास आघाडीची सत्ता आहे. प्रत्येक सदस्याला संधी मिळावी म्हणून आघाडी अंतर्गत कार्यकाळ ठरविण्यात आला आहे. या पंचायत समितीमध्ये 14 सदस्य संख्या आहे. एकमेव भाजपच्या असलेल्या योगिता कांबळे यांचे शिरोळ ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेत झाल्यामुळे सदस्यत्व रद्द झाले आहे तर स्वाभिमानीचे सदस्य सुरेश कांबळे यांचे निधन झाल्याने सध्या 12 सदस्य आहेत.