शिरोळ / प्रतिनिधी
येथील पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड आज होणार असून शिवसेनेच्या एकमेव महिला सदस्या सौ कविता चौगुले,भागवत यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान पंचायत समितीच्या सभापती सौ. मिनाज जमादार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे.
या पंचायत समितीमध्ये तीन काँग्रेस, तीन राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना, एक अपक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चार अशी सदस्य संख्या आहे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, व शिवसेना असे एक होऊन सत्ता स्थापन केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे या प्रमाणे या ठिकाणीही सत्तेत सहभाग मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्यही आग्रही आहेत.
या पंचायत समितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्या आघाडीची सत्ता आहे.









