प्रतिनिधी / शिये
शिये ( ता.करवीर ) येथील श्रीरामनगरमधील एका वीस वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल आज रात्री नऊच्या सुमारास पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शियेतील कोरोना रुग्णांची संख्या चार झाली आहे. रविवारी १२ जूलै रोजी विठ्ठल नगर येथील एका ६५ वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील आठ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते.यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एक व्यक्ती पन्हाळा तालूक्यातील आहे. तर एक जण रामनगर, शिये येथील आहे.
शिये फाटा येथील क्रशर विभाग, गावभाग, विठ्ठल नगर आणि आता श्रीरामनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींमुळे गावात संसर्गाचा धोका वाढला आहे. पॉझिटिव्ह युवकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
श्रीरामनगर परिसर आणि शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये केवळ काही फुटांचे अंतर आहे. त्यामुळे शेकडो औद्योगिक कामगार या परिसरात भाड्याने खोली घेऊन राहतात. रामनगर येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.








