प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना रूग्णांची वाढती संख्या, त्याचा सीपीआर प्रशासनावर वाढत जाणार ताण पाहता मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची आवश्यकता वाढली आहे. महापालिकेच्यावतीने शाहू स्मारक येथे कोरोना रूग्णांसाठी तातडीने मध्यवर्ती नियंत्रण कक्ष उभारण्याचा निर्णय बुधवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेंट्टी उपस्थित होते.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सीपीआर हॉस्पिटलला भेट दिली. तेथे अधिष्ठाता कार्यालयात झालेल्या बैठकीतला आयुक्त डॉ. कलशेट्टी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, महापालिका सभागृह नेता दिलीप पोवार, सीपीआरमधील डॉ. सैबन्नावर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राहूल बडे, डॉ. गिरीष कांबळे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, आश्पाक आजरेकर आदी उपस्थित होते.
महापौर आजरेकर म्हणाल्या, ‘सीपीआर’मध्ये येणाऱया रुग्णांना योग्य माहिती देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचे काम मध्यवर्ती नियंत्रण कक्षामार्फत केले जाणार आहे. रुग्णांची मानसिकता ओळखून त्यांना योग्य ती माहिती व आधार मिळावा यासाठी हा कक्ष कार्यरत राहील. नियंत्रण कक्षामध्ये 12 ऑक्सिजनेटेड बेड तात्काळ तयार करण्याचे निर्देशही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. या कक्षा मार्फत प्रामुख्याने ‘मे आय हेल्प यू’ या पद्धतीने रुग्णांना आधार व मार्गदर्शन करण्याचे काम केले जाईल, असा त्यांनी स्पष्ट केले.
महापौर आजरेकर यांनी शाहू भवन येथील मध्यवर्ती नियंत्रण कक्षामध्ये सीपीआर कडील डॉक्टर्स, महापालिकेकडील अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक उपलब्ध करुन देण्याची सुचना केली. हा कक्ष दोन दिवसांत पुर्ण क्षमतने उभा करण्यासाठी महापालिका सक्रीय पुढाकार घेईल. या कक्षामार्फत रुग्ण व नातेवाईकांना मार्गदर्शनाबरोबरच बेड व्यवस्थापनावरही भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पॉझिटिव्ह गर्भवतींची सीपीआरमध्ये प्रसुतीची व्यवस्था
अधिष्ठाता डॉ. म्हस्के म्हणाले, गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्यांनी तात्काळ सीपीआरमध्ये यावे. त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. गर्भवतींची अँटिजन टेस्ट तात्काळ करुन पॉझिटिव्ह असल्यास प्रसुतीची तात्काळ व्यवस्था केली जाईल. गर्भवतींनी भीती न बाळगता टेस्ट करुन घ्यावी. त्यातून प्रसुती निर्धोक होण्यास मदत होणार आहे.
शहरवासियांनी कोरोनाची लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी. त्यातून रुग्णांना त्वरित उपचार मिळून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल. शहर वासियांनी ताप, सर्दी, खोकला अंगावर काढू नयेत. तात्काळ हॉस्पिटलशी संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन महापौर आजरेकर यांनी केले. शहरात ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून ट्रेसिंग वाढवण्यावर अधिक भर दिला आहे. भविष्यात कोरोना प्रतिबंधासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करेल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिली. अधिष्ठाता डॉ. म्हस्के यांनी सीपीआरमधील कोरोना रुग्णासाठींच्या उपचाराबाबत माहिती दिली. महापौर आजरेकर व आयुक्त डॉ.कलशेट्टी यांनी सीपीआरमधील ऑक्सिजन, व्हेटिंलेटर, बेडची माहिती घेतली.