राज्यस्तरीय वेबिनारमध्ये प्रा. जयंत आसगावकर यांची मागणी
प्रतिनिधी / वाकरे
महाराष्ट्र शासनाने यापुढे शिक्षण क्षेत्रातील कोणतेही धोरणात्मक निर्णय घेत असताना शिक्षण क्षेत्रातील समन्वय समिती नेमून त्यानंतरच याबाबतीत निर्णय घ्यावेत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव प्रा. जयंत आसगावकर यांनी केली.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, कोल्हापूर विभाग यांच्यावतीने आणि कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव प्रा.आसगावकर यांनी आयोजित केलेल्या शिक्षण संस्था महामंडळाच्या राज्यस्तरीय वेबिनारमध्ये ते बोलत होते. प्रा. आसगावकर यांनी यापुढील काळात शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आणि त्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्यवाही याबाबत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील शिक्षण संस्था महामंडळाला विश्वासात घ्यावे असे मत व्यक्त केले.
या वेबिनारमध्ये गोपाळ सामंत यांनी सर्वोच्च न्यायालयामधील खटल्याची माहिती दिली. यावेळी वेबिनारमध्ये इयत्ता ५ चा वर्ग ४ थीला जोडणे, प्रस्तावित नवीन संच मान्यता निकषाबाबत हरकती, चालू वर्षाचे वेतनेतर अनुदान, पवित्र पोर्टल नोकर भरती या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेबिनारला महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील, उपाध्यक्ष वसंत पूईखेडकर, उपाध्यक्ष अशोक थोरात, कायदेशीर सल्लागार रवींद्र फडणवीस, कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष सर्जेराव लाड उपस्थित होते. या वेबिनारमध्ये शिक्षण चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थासमोरील अडचणी मांडून काही सूचना केल्या. आभार विभागाचे अध्यक्ष शिवाजी माळकर यांनी मानले.









