प्रतिनिधी / कोल्हापूर
स्वच्छ आणि सुंदर शहर या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱयाने महापालिकेला आपलं घर मानून कार्यरत राहावे, स्वच्छ, सुंदर कोल्हापूरची शपथ घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. स्वच्छतेबरोबरच संपूर्ण शहरासह नाले आणि ओढे अतिक्रमण मुक्त करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. गांधी मैदान येथे आयोजित गांधी जयंतीनिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात बोलत ते होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे गांधी मैदान येथे मोबाईल टॉयलेट आणि 65 ऑटो टिप्परचे लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते व आमदार चंद्रकांत जाधव, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी प्रारंभी गांधी मैदानावरील गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोंडाळेमुक्त शहर संकल्पना यशस्वी करण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱयांचे महत्वपुर्ण योगदान आहे. त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. स्वच्छतेमध्ये कोल्हापूर शहर कसे अग्रेसर राहील यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याबरोबरच शहरातील जे नाले आणि ओढे आहेत ते अतिक्रमण मुक्त केले पाहिजेत. यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी. स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूरसाठी संपुर्ण शहर अतिक्रमण मुक्त करणे काळाची गरज आहे. जास्तीत जास्त पर्यटकांनी कोल्हापूरात यावे यासाठी पर्यटनाच्या माध्यमातून `डेस्टीनेशन कोल्हापूर’ ही संकल्पना सुरु केली आहे.
त्यासाठी महापालिका हे आपलं घर मानून प्रत्येक कर्मचाऱयांने आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ आणि सुंदर शहराची शपथ घेऊन महापालिकेच्या नावलौकिकात भर घालावी, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापालिकेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उत्कृष्ट काम करणाऱया कर्मचाऱयांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ड्रेनेज विभागाकडील सफाई कर्मचाऱयांना युनिफॉर्म प्रदान करण्यात आला. कचरा वेचक एकटी संस्थेच्या महिलांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी गटनेते शारगंधर देशमुख, अजीत ठाणेकर, माजी उपमहापौर अर्जुन माने, संजय मोहिते, भूपाल शेटे, माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास, सचिन पाटील, माजी नगरसेवक राहूल माने, सचिन चव्हाण, प्रकाश गवंडी, विजयसिंह खाडे-पाटील, विनायक फाळके, प्रविण केसरकर, माजी नगरसेविका उमा बनछोडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एन एस पाटील, नारायण भोसले, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, सुयोग मगदूम, दिग्वीजय मगदूम, शरद तांबट, ऍड. धनंजय पठाडे आदींसह नागरिक उपस्थित होते.









