कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र शिवजयंती साजरी केली जात आहे. कोल्हापूर शहरात छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे नागरिकांसाठी खुले केले आहेत. यासह अनेक नवनवीन संदेश देणारे देखावेही शहराच्या ठिकाणी नागरिकांसाठी गेले काही दिवस खुले आहेत.
तसेच आज जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही शिवजयंती साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर इस्पुर्ली, ता. करवीर येथे शिवजयंती पार पडली, यावेळी छत्रपती शिवरायांच्या जन्म काळाचा विशेष सोहळा ही पार पडला. या सोहळ्यात इस्पुर्ली ग्रामपंचायत सरपंच राजाराम पाटील-म्हाकवेकर, उपसरपंच राजाराम चौगुले, ग्रामपंचायत सदस्य चेतन चव्हाण यांच्यासह गावातील सर्व तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक नागरिक जमतील असे कार्यक्रम घेतली जाणे टाळले जात असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना शिवजयंती ही कमीत कमी नागरिकांच्या उपस्थितीत शक्यतो कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही अशा प्रकारे साजरी करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अपवाद वगळता लोक समुदायाने एकत्र येतील अशा कार्यक्रमांचे आयोजन टाळले गेले असून मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत सकाळच्या वेळेत जन्मकाळ सोहळा पार पडला आहे.









