शहरातील छत्रपती शिवाजी रोड परिसरातील गल्लीत युवकांची दहशत, परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त, पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
कोल्हापूर / संजीव खाडे
शहरात गांजांची नशा करणाऱया युवकांच्या संख्येत दिवसेदिवस वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. या चिंतेत आणखीन भर टाकणारे गंभीर प्रकारही आता सुरू झाले आहेत. छत्रपती शिवाजी रोड परिसरातील एका गल्लीत गांजाच्या नशेत धुंद झालेल्या काही युवकांनी तोडफोडीचे प्रकार करताना रोखण्यास आलेल्या नागरिकांवर हल्ला करण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून या युवकांना गांजा कुठून उपलब्ध होतो ?, पोलीस यंत्रणा काय करत आहे? असे प्रश्न नागरिकांतून उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
गांजाची नशा करणाऱयांमध्ये दिवसेदिवस वाढत होत असल्याचे चित्र आहे. शहराच्या उपनगरातील निर्जन भागासह नदी, ओढÎांचा परिसर, मैदाने, स्टेडियममध्ये गांजा ओढण्यासाठी टोळकी जमतात. तेथे गांजाचा कश मारल्यानंतर टोळक्यातील युवक नशेत गुंग होतात. त्यांना कोणतेही भान राहत नाहीत. गांजाच्या वाढत्या नशेमुळे नशाखोर युवकांच्या पालकांतील चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी युवकाची टोळकी सामुहिकरित्या गांजाची नशा करताना दिसत आहेत. त्यातील काही टोळक्यांकडून हल्ल्याचे, तोडफोडीचे प्रकारही आता सुरू झाले आहेत.
छत्रपती शिवाजी रोड परिसरातील गल्लीत दहशत
छत्रपती शिवाजी रोड परिसरातील एका गल्लीत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गांजा ओढलेल्या चार युवकांनी नशेत धिंगाणा घालत तोडफोड केली. त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांना नशेत असलेल्या युवकांनी शिविगाळ करत त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. धमकीही दिली. अखेर त्यांना कसेबसे रोखत त्यांच्या पालकांकडे देण्यात आले. बदनामी टाळण्यासाठी स्थानिक स्तरावर हा प्रकार मिटविण्यात आला.
पोलीस काय करत आहेत? ः नागरिकांतून सवाल
गांजा सहजपणे उपलब्ध होत असल्याने तरुणाई त्याकडे आकर्षित झाली आहे. गल्ली, भागात गांजा सहजपणे पुरविणारे पेंडलर वाढत आहेत. त्यांना स्थानिकातील काहींची मदत असते, हे लपून राहिलेले नाही. गांजांची वाढलेली विक्री आणि नशा करणाऱयांचे वाढत चाललेले प्रमाण गंभीर आहे. अशा स्थितीत पोलीस यंत्रणा काय करत आहे?, असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे.
आता दारूच्या नशेत नव्हे तर गांजाच्या नशेत
दारूच्या नशेत मारामारी, तोडफोड केल्याच्या घटना, प्रकार आतापर्यंत घडत असताना आता गांजाच्या नशेत तसे प्रकार घडण्यास प्रारंभ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
गांजा पेडलरना कोण पकडणार ?
गांजा असो वा इतर कोणताही अंमल पदार्थ असो तो विकणाऱयांना (ड्रग पेडलर) पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडे (एनसीबी) असते. एनसीबीचे मुख्यालय मुंबईत आहे. त्यामुळे कोल्हापूरसारख्या स्थानिकस्तरावर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस दलाकडेही असते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून गांजा पेंडलरना पकडावे, तरुणाईला वाचवावे, अशी मागणी होत आहे.
गांजा ओढलेल्या मुलींचा धिंगाणा
गांजाची नशा करणाऱयांत मुलींचेही प्रमाण वाढत आहे. शहरातील एका स्टेडियमध्ये गांजा ओढलेल्या काही तरुण धिंगाणा घालत होत्या. त्यांना अटकाव करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना त्या तरुणींकडून चाकू दाखवण्याचा प्रकार घडल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.









