प्रतिनिधी / कोल्हापूर
शिंगणापूर बंधाऱयाला लागलेल्या गळतीमुळे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करता आला नव्हता. मात्र पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱयांनी चॅनेलच्यावरती साचलेला जवळपास पाच फूट गाळ काढून बंधाऱयाची गळती काढली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजता पुईखडी, रात्री तीन वाजता बावडा, नागदेववाडी आणि पहाटे साडेचार वाजता बालिंगा पम्पिंग स्टेशन चालू केली. त्यानंतर बुधवारी सकाळच्या सत्रात शहरात सर्वत्र पाणीपुरवठा सुरळीत झाला, अशी माहिती जलअभियंता अजय साळोखे यांनी दिली.
शिंगणापूर बंधाऱयावरील 20 प्लेटांपैकी सहा प्लेटांना गळती लागली होती. तळाला असलेल्या देन प्लेटांची गळती काढताना पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱयांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर मंगळवारी रात्री गळतीचे काम पूर्ण झाले. दरम्यान मंगळवारी शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे पालिकेने 57 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला.
जयंती नाल्यातील सांडपाण्याच्या प्रमाणात घट
शिंगणापूर बंधाऱयाला लागलेल्या गळतीमुळे शहरातील पाणीपुरवठÎावर परिणाम झाला. त्यामुळे त्या दोन ते तीन दिवसांमध्ये जयंती नाल्यातील सांडपाण्यामध्ये घट दिसून आली. साधारण प्रतिदिन दहा ते बारा एमएलडी एवढी घट जाणवली. या दिवसांमध्ये पाण्याची नेहमीची पातळी कमी झाली होती. जयंती नाल्यातील मोठÎा प्रमाणात असलेला गाळ मात्र काढण्याची गरज आहे.









