ऑक्सिजन निकृष्ट : नातेवाईकांचा प्रशासनावर आरोप
प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये गुरूवारी दुपारी वॉर्डमधून अतिदक्षता विभागात नेताना एका रूग्णाचा मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन निकृष्ट आहे, आधीच बेड दिल्याने या रूग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी निकृष्ट ऑक्सिजनच्या तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबत नातेवाईक आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार न्यू शाहूपुरी येथील 78 वर्षीय वृद्धाला 10 दिवसांपुर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारार्थ सीपीआरमध्ये दाखल केले हेते. त्यांच्यात सुधारणाही झाली होती. त्यांची प्रप़ृती गंभीर बनल्याने गुरूवारी दुपारी त्यांना अतिदक्षता विभागात आणले जात होते. स्वार यांच्यावर मानसोपचार वॉर्डमध्ये उपचार सुरू होते.
जुन्या इमारतीतील न्यु कॅज्युलिटी वॉर्डमध्ये व्हेंटिलेटर बेड रिक्त झाल्याची माहिती मिळाली. त्यातील एक बेड अपघात विभागातून आलेल्या रूग्णाला तातडीने देण्यात आला. अन्य एक बेड शिल्लक होता. मानसोपचार विभागात गंभीर असलेल्या स्वार यांना अधिक उपचारासाठी न्यु कॅज्युलिटी वॉर्डमधील अतिदक्षता विभागात दुपारी अडीचच्या सुमारास आणले. पण याचवेळी हा बेड सीपीआरमधील वरिष्ठांच्या नातेवाईकांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती रूग्णाच्या नातेवाईकांना मिळाली. त्यामुळे पुन्हा स्वार यांना मानसोपचार वॉर्डमध्ये नेण्यात आले. पण वॉर्डच्या दारातच दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी बेड रिकामा असताना तो इतरांना का दिला, अन् रूग्णाला बेड उपलब्ध नसताना का हलवले, असा प्रश्न केला. रूग्णांना देण्यात येणारा ऑक्सिजनही निकृष्ट असल्याचा आरोप केला. यासंदर्भात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी ऑक्सिजनसंदर्भात तातडीने चौकशीचे आदेश दिले. म्युकर मॉयकॉसीस रूग्ण वाढल्याने सध्याचा वॉर्ड हाऊसफुल्ल झाला आहे. त्यासाठी मानसोपचार वॉर्ड रिक्त करण्यात येत आहे. तेथे असलेल्या रूग्णांना अन्य वॉर्डमध्ये स्थलांतरीत करण्यात येत आहे. त्यामुळे या रूग्णाचा मृत्यू स्थलांतरीत करताना झाल्याची माहिती दिली.









