माजी नगरसेवक अजित ठाणेकर
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना पार्श्वभूमिवर मिरवणुकांवर बंदी घातली आहे. परंतू महापालिकेने शहरातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे इराणी खण येथे एकाच ठिकाणी विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गर्दी कमी होण्याऐवजी वाढणार आहे. ही गर्दी टाळावयाची असल्यास विसर्जन विकेंद्रित ठिकाणी करा, अशी मागणी महापालिकेचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे. यंदा मूर्तींचा आकार कमी असल्यामुळे शहराच्या विविध भागात असलेल्या काही नैसर्गिक स्त्रोतांचा विसर्जनासाठी वापर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
शहराच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे विसर्जनासाठी मूर्ती आणताना कितीही प्रयत्न केला तरीही त्या मिरवणुकाच होणार आहेत. त्यामुळे शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन होणार आहे. गतवर्षी इराणी खणीवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, काही स्वयंसेवी संस्था व खासगी संस्थानचे स्वयंसेवक यांची प्रचंड गर्दी दिसत होती.
संध्यामठ येथे कुंडामध्ये लहान गणेशमूर्तीचे विसर्जन करा
इराणी खणीकडे जाण्यासाठी एकच रस्ता आहे. त्यामुळे तेथे मंडळांची गर्दी होते. एकापेक्षा अनेक ठिकाणाहून विसर्जन करता येण्याजोगी व्यवस्था करणे आवश्यक आहे. यामध्ये आकाराने लहान मूर्ती असल्यास रंकाळा येथील संध्यामठजवळ घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी केलेल्या कृत्रिम कुंडामध्ये त्यांचे विसर्जन शक्य असून इराणी खणीवरील गर्दी कमी होणार असल्याचेही ठाणेकर यांनी म्हटले आहे.









