प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूरच्या उजळाईवाडी विमानतळाला नागरी विमान मंत्रालयाने उडान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ओडिशा येथील झारसगुडा येथे नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक (व्यवसाय आणि विकास) डॉ. अनिल गुप्ता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार हे उपस्थित होते.
गेल्या अडीच वर्षातील कामगिरीची दखल नागरी विमान मंत्रालयाने घेतली. या मंत्रालयाने कोल्हापूर विमानतळाला उडान पुरस्काराने सोमवारी सन्मानित करण्यात आले.
मर्यादित साधने आणि पायाभूत सुविधा असताना अडीच वर्षापूर्वी कोल्हापूर विमानतळावरून केंद्र सरकारच्या उड़ान योजनेंतर्गत तिरुपती, हैदराबाद मुंबई, बंगळुरू या मार्गावर विमानसेवा सुरू झाली. प्रवाशांचा प्रतिसाद व प्रवाशांची वाढती संख्या आणि सुविधा वाढल्याने याची दखल घेऊनच, नागरी विमान मंत्रालयाने अनसर्व्हड एअरपोर्टस् विथ मोस्ट आरसीएस रूटस् ऑपरेनायझड (बहुतांश प्रादेशिक मार्ग कार्यरत नसलेले विमानतळ) या श्रेणीतून कोल्हापूर विमानतळाला पुरस्काराने सन्मानित केले आहे.
यापूर्वी कोल्हापूर विमानतळ जलसंवर्धनात उल्लेखनीय कामगिरीबद्दल जलशक्ती मंत्रालयाचा द वॉटर डायजेस्ट अवॉर्ड (डिसेंबर 2020) लंडनमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे प्रशस्तीपत्र मिळाले आहे. नागरी विमान मंत्रालयाचा कोल्हापूर विमानतळाला उड़ान पुरस्कार मिळाल्याचे श्रेय कोल्हापूरातील नागरीक, प्रवासी, लोकप्रतिनिधी आणि विमानतळावरील अधिकारी व कर्मचाऱयांचे आहे.









