वार्ताहर / उचगाव
विनापरवाना भिशी चालवून तीन लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सचिन उर्फ आनंदा कांबळे (वय ३४ रा. बिरदेव मंदिर शेजारी, गडमुडशिंगी) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची कोठडी दिली आहे.
याबाबत फसवणूक झालेली महिला अश्विनी अनिल दांगट (वय ३४, रा. महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना रस्ता, गडमुडशिंगी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सचिन कांबळेने दांगट यांना विश्वासात घेऊन भिशी चालवत असल्याचे सांगितले. दिवाळी व गुढीपाडव्याला भिशी वाटप करतो व १७ टक्के व्याज दिले जाते असे आमिष दाखवले. त्यानंतर दांगट यांनी नातेवाईकांसह एका खाजगी शाळेतील महिलांकडून भिशीसाठी रक्कम प्रत्येक महिन्याला आणून सचिन कांबळेकडे दिली. हा प्रकार १४ ऑक्टोबर २०१९ पासून २५ ऑक्टोबर २०२० पर्यंत चालू होता.
तीन लाख ७० हजार रुपयांची रक्कम संबंधित महिलांनी सचिन कांबळेकडे भिसीसाठी भरली. पण त्यानंतर त्याने भिशी वाटप केलेच नाही. दांगट यांनी वारंवार रकमेसाठी तगादा लावला. पण रक्कम मिळून आली नाही. आपल्यासह संबंधित भिशी भरणाऱ्या महिलांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दांगट यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध नियमानुसार व फसवणूक केल्याबद्दल सचिन कांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम करत आहेत.









