प्रकाश सांडुगडे / पाटगांव
पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड नोंदणीची सक्ती शालेय शिक्षण विभागाकडून कऱण्यात आली असताना राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांची अद्याप आधार नोंदणीच झालेली नाही. यासाठी व असंख्य विद्यार्थ्यांची लहान असताना काढलेली आधार कार्ड अपडेट करण्याची गरज आहे या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व नोंदविलेल्या कार्डचे अद्ययावतीकरण करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. जिल्हयातील प्रत्येक शाळेत आधारकार्ड नोंदणी व अपडेटचे कॅम्प घेणात येणार आहेत.
केंद्र शासनाने विविध कामकाजासाठी व शैक्षणिक सवलतींसाठीआधार कार्ड बंधनकारक केलेले आहे. राज्यातील बहुतेक विद्यार्थ्यांची आधार कार्ड ५ वर्षांहून लहान असताना तसेच वयाची १५ वर्षे पूर्ण होण्याच्या आधी काढलेली आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. यामुळे शाळांनी बँक, पोस्ट ऑफिस, बीएसएनएल या यूआयडीएआयच्या नोंदणीकृत आधारसेवा केंद्रामधून विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण व अद्ययावतीकरणाची कार्यवाही करावी, असे आदेश शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.
अस्तित्वात असलेल्या आधारसेवा केंद्रामार्फतच आधार अपडेटची प्रक्रिया करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अपडेट करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याची आवश्यकता आहे. गटशिक्षणाधिकार्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना शाळांच्या जवळ असणार्या आधार सेवा केंद्रांशी संपर्क साधून शाळांमध्येत कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना द्याव्यात. यासाठी आधार सेवा केंद्राचा सविस्तर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात असून गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेमध्ये आयोजित केलेल्या आधार कॅम्पचा आढावा दर आठवड्याने घ्यावा असे आदेश शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी जारी केले आहेत.









