विज्ञान शिक्षकांचा जि.प.प्रशासनाला सवाल, तत्काळ पदोन्नती करण्याची मागणी, 17 डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेदिवशी करणार लाक्षणिक उपोषण
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत बारावी विज्ञान शिक्षकांकडून `विषय शिक्षक’ पदोन्नतीसाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. यामध्ये दोन वर्षांहून अधिक कालावधी झाला तरी प्रशासनाने ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे विज्ञान शिक्षकांना न्याय कधी मिळणार ? असा प्रश्न शिक्षकांतून उपस्थित केला जात आहे. पदोन्नतीसाठी जि.प.प्रशासनाकडून चालढकल केली जात असल्यामुळे हक्कापासून वंचित प्राथमिक शिक्षकांनी 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेदिवशी लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.
विज्ञान शिक्षकांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनादरम्यान सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्यासोबत चर्चा करून पदोन्नतीचा विषय लवकरच मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही शिक्षण सभापती रसिका पाटील यांनी दिली होती. विज्ञान विषय शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत शिक्षण समिती सभेत ठराव झाला असून त्यानुसार ऑक्टोबर अखेरपर्यंत पदोन्नतीचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे साडेचारशे शिक्षकांच्या पदोन्नतीचा विषय मार्गी लावला जाणार होता. त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित विज्ञान शिक्षकांची पदोन्नती करण्याचे आश्वासन दिले होते. 24 नोव्हेंबरला पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचे निश्चित झाले होते. पण आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
सुमारे 80 टक्के उच्च प्राथमिक शाळेत विज्ञान विषय शिक्षक उपलब्ध नसताना पदोन्नती पात्र सुमारे 737 हून अधिक शिक्षकांना डावलले जात असल्याचा विज्ञान विषय शिक्षक कृती समितीचा आरोप आहे. आपल्या न्याय, हक्कासाठी सनदशीर मार्गाने शासन निर्णयानुसार विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती करण्याची मागणी करत आहेत. या संदर्भातील कार्यवाही करताना विज्ञान पदोन्नतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करवा, विज्ञान शिक्षक एकूण रिक्त पदे शाळानिहाय यादी जाहीर करावी, पदोन्नती प्रक्रिया दोन टप्प्यात घ्यावी, यामध्ये पहिला टप्पा पदोन्नती नंतर ऐच्छिक पदावनती घेण्यात यावी. विषय शिक्षक समायोजनानंतर पदोन्नतीचा दुसरा टप्पा राबवावा, पहिल्या टप्प्यानंतर उर्वरित सर्व पदोन्नती पात्र शिक्षकांची संधी कायम ठेवावी.
हे शक्य नसल्यास पहिल्या टप्प्यात पदोन्नतीसाठी सर्व रिक्त जागा उपलब्ध करून तत्काळ पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण करावी. आणि वंचित व अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी विज्ञान विषय शिक्षक कृती समितीची मागणी आहे.
पदोन्नतीचा निर्णय, पण कार्यवाही शून्य
जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुमारे 737 शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी हिरवा कंदील दर्शवला असला तरी त्यानुसार कार्यवाही केली जात नसल्यामुळे विज्ञान विषय शिक्षाकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ कृती समितीकडून उपोषणाचा निर्णय घेतला आहे.