कोल्हापूर / प्रतिनिधी:
येथील सानेगुरुजी प्रभागातील बिडी कामगार वसाहत येथे जोरदार सोसाट्याच्या वारा व मुसळधार पावसामुळे मंगळवारी सायंकाळी विजेच्या तारांवर वृक्ष कोळसले. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. अग्निशामक दलाचे जवान तात्काळ दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण वीज पुरवठा खंडित झाल्याने येथील नागरिकांची गैरसोय झाली. रात्री वीज पुरवठा सुरळीत होऊ न शकल्याने नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली. तसेच सध्या उकाड्याचे दिवस असल्याने व वीज पुरवठा खंडित असल्याने पंखे बंद राहिले त्यामुळे रात्री अंगाची लाही लाही करतच रात्र काढावी लागली.
मोठा अनर्थ टळला….
मंगळवारी सायंकाळी जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे भलेमोठे वृक्ष उन्मळून विजेच्या तारांवर पडले. या परिसरात लहान मुले खेळत असतात. तसेच नागरी वस्ती असल्यामुळे नागरिकांची नेहमी रहदारी असते. जर हे वृक्ष घरावर पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. मंगळवारी सायंकाळी विजेच्या तारांवर वृक्ष कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. पण दुसऱ्या दिवशीही वीज पुटवठा सुरळीत होऊ न शकल्याने येथील नागरिकांच्यातून प्रशासना च्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. त्यातच सध्या उकाड्याचे दिवस असल्याने नागरिक हैराण होत आहेत.









