वारणानगर / प्रतिनिधी :
वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या सर्वच गांवाना पिण्याच्या पाण्याची टंचाई गेल्या दहा दिवसापासून भेडसावत असून नदी आहे उशाला कोरड पडल्या घशाला अशी अवस्था वारणा काठच्या गावात झाली असून यामध्ये मोहरे ता. पन्हाळा या गावचा पाणीपुरवठा आठ दिवसांनी सुरळीत झाला आहे.
महापुर आल्यामुळे तसेच पात्रातील पाण्याची पातळी अद्याप वाढूनच आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणी पुरवठा करणारे जॅकवेल पाण्याखाली गेले आहेत. तसेच पुरामुळे विजपुरवठा करणारे खांब व तारा पडल्यामुळे वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे गेले आठ दिवस वारणा काठच्या गावाचा पाणीपुरवठा बंद झाला असून वीज पुरवठा सुरळीत होणे व विद्युत पंपाची स्वच्छता व देखभाल पूर्ण झालेशिवाय पाणी पुरवठा सुरळीत होणार नसल्याने अनेक गावांत पर्यायी व्यवस्थेने पाणी पुरवठा सुरू आहे.
तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येने मोठे असलेल्या कोडोलीत कूपनलिकेद्वारे व टँकरने पाणी पुरवले जात असून अनेक गांवात अशीच परिस्थिती आहे. कोडोली ग्रामपंचायत, अनेक संस्था, मंडळे टँकरने पाणी पुरवठा करीत आहेत. तर कोडोली उपजिल्हा रुग्णालयास ही टँकरने पाणी पुरवठा काही दिवस करण्यात आला आहे.
वारणा नदीत महापुरामुळे पात्राबाहेर पाणी असून देखील नदी काठच्या गावात पाणी टंचाई असल्याने ग्रामपंचायत गाव स्वच्छतेबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी काम करू लागल्या आहेत. मोहरे येथे सरपंच शिवाजी मोहिते, उपसरपंच संदीप डोईफोडे, सदस्य, कर्मचारी यांनी जुन्या गाव विहिरीवरून पाणीपुरवठा सुरळीत करण्यास आठ दिवसांनी सुरवात केली आहे त्यामुळे ग्रामस्थांत समाधान पसरले आहे.









