प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील सीपीआर हॉस्पिटल 1 मार्चला कोरोना हॉस्पिटल झाले, तेव्हापासून जिल्हय़ातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यत 800 हून अधिक कोरोनामुक्त येथून झाले आहेत. पण गेल्या चार दिवसांत वाढलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांमुळे सीपीआरमधील वॉर्ड हाऊसफुल्ल झाले आहेत. ट्रॉमा केअर, अतिदक्षता विभागासह अन्य वॉर्डमधील बेडही फुल्ल झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पॉझिटिव्ह, संशयित रूग्णांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न सीपीआर प्रशासनासमोर आहे.
जिल्हय़ात फेब्रुवारीच्या तिसऱया आठवडय़ात कोरोना संशयित रूग्ण सापडला, सीपीआर हॉस्पिटल 1 मार्चपासून फक्त कोरोना रूग्णांसाठी घोषित केले गेले. येथील अन्य विभागांतील रूग्ण सेवा रूग्णालयात पाठवले गेले. जीवनदायी योजनेतील रूग्ण समाविष्ट हॉस्पिटलमध्ये पाठवले गेले. लॉकडाऊनमुळे एप्रिलपर्यत रूग्णसंख्या कमी होती. मेअखेरीस ती पुन्हा वाढली, जूनमध्ये पॉझिटिव्ह रूग्णांचा आलेख खाली आला, तर जुलैमध्ये तो पुन्हा वाढत निघाला आहे. गेल्या चार दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने सीपीआरमध्ये बेड अपुरे पडत आहेत.
सीपीआर हॉस्पिटल 650 बेडचे आहे. तेथे 25 हून अधिक वॉर्ड आहेत. बाहय़रूग्ण, अंतर्गत रूग्ण विभागासह ट्रॉमा केअर सेंटर, चार अतिदक्षता विभाग, लहान मुलांचा अतिदक्षता विभाग, ब्लड बँक, परीचारिका प्रशिक्षण केंद्र आहे. हॉस्पिटलचे व्यवस्थापन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहे. रोज येथे सरासरी दीड हजार रूग्ण उपचार घेतात. कोरोना काळात 3 महिन्यांपासून येथे फक्त कोरोना पॉझिटिव्ह, संशयित रूग्णांवर उपचार होत असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.
जिल्हय़ात 1 जुलै रोजी 850 पॉझिटिव्ह रूग्ण होते, त्यातील 720 जण कोरोनामुक्त झाले होते. 12 जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. 118 रूग्ण हायरिस्क होते. 12 दिवसांत मंगळवारपर्यत यामध्ये वाढ होत गेली. मंगळवारी पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 हजार 332 झाली. 860 जण कोरोनामुक्त झाले, 32 जणांचा कोरोनाने बळी घेतला तर 440 ऍक्टिव्ह रूग्ण येथे उपचार घेत आहेत. गेल्या 12 दिवसांत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 482 झाली, तर 20 जणांचा बळी गेला, 140 जण कोरोनामुक्त झाले, सद्यस्थितीत 322 ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. सीपीआरमध्ये 440 रूग्णांवर उपचार सुरू असल्याने हॉस्पिटलमधील सर्व वॉर्ड फुल्ल झाले आहेत. कोरोना अपर अन् लोअर वॉर्डमध्ये तर वाढत्या रूग्णसंख्येमुळे रूग्ण कुठे हलवायचे, हा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
1 ते 13 जुलै दरम्यानची सीपीआरमधील स्थिती
वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण ः 482
कोरोनामुक्त झालेले रूग्ण ः 140
कोरोना बळींची संख्या ः 20
कोरोना रूग्ण ः 322








