कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे निर्णय शक्य-
आणखी सात दिवस लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता
प्रशासन पातळीवर हालचाली सुरु
कृष्णात चौगले / कोल्हापूर
गेल्या महिनाभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी 20 ते 26 जुलैपर्यंत सात दिवसांचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात लॉकडाऊनला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत असून संचारबंदीसदृश्य स्थिती आहे. तरीही गेल्या पाच दिवसात एक हजारांहून अधिक रुग्णसंख्या झाली आहे. रविवारी (26 जुलै) लॉकडाऊनचा कालावधी समाप्त होत असला तरी कोरोना संसर्गाची परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन पातळीवर लॉकडाऊनच्या कालावधीत पुन्हा सात दिवस वाढ करण्याबाबत हालचाली सुरु आहेत.
समूह संसर्गजन्य स्थिती उद्भवल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनीसोबत चर्चा करून पालकमंत्री सतेज पाटील यांनी सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेले पाच दिवस कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या सर्वच भागातील व्यवहार ठप्प आहेत. नेहमी वर्दळ असलेले शहरातील रस्ते, चौक निर्मनुष्य दिसत आहेत. यापूर्वी देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात किराणा मालाची दुकाने आणि भाजीपाल्याची विक्री सुरु ठेवण्यात आली होती. त्यामुळे लॉकडाऊन असून देखील भाजीपाला आणि किराणा खरेदीच्या नावाखाली अनेक जण घराबाहेर पडत होते. पण या सात दिवसांच्या कालावधीत दुकानांसह भाजीपाला विक्रीही बंद ठेवल्यामुळे रस्ते पूर्णपणे ओस पडले आहेत.
आणखी सात दिवस होणार लॉकडाऊन?
जिल्ह्यातील नागरिकांकडून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख कायम आहे. शहरांबरोबरच खेडय़ापाडय़ापर्यंत कोरोनाचे लोण पोहोचले असून समुह संसर्गजन्य स्थिती निर्माण झाला आहे. शुक्रवारी ही रुग्णसंख्या तीनशेहून अधिक झाली. लहानशा गावांमध्येही मोठय़ा संख्येने कोरोनाबाधित सापडत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचे लॉकडाऊन केले असले तरी त्यापूर्वी संसर्ग झालेले रुग्ण आता बाधित होताना दिसत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केवळ सात दिवसांचा कालावधी पुरेसा नसून त्यामध्ये आणखी सात दिवस वाढ करण्याबाबत प्रशासन पातळीवर हालचाली सुरु असल्याचे समजते.
लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत मतमतांतर
लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केल्यास पुन्हा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार असल्यामुळे सात दिवसांहून अधिक कालावधी नको अशी समाजातील एका वर्गाची मागणी आहे. तर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणखी काही दिवस कालावधीत वाढ करावी असा दुसरा एक मतप्रवाह आहे. नागरिकांमध्येही मतमतांतर पहावयास मिळत आहे.
जिल्हा प्रवेशाचे ऑनलाईन पास बंद, तरीही 772 जणांची ‘एन्ट्री’
जिह्यात कोरोनो रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. विशेषतः मुंबई, पुणेसह परजिह्यातून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यापूर्वीच 18 जुलैपासून पंधरा दिवस जिह्यात प्रवेश करण्यासाठी अथवा जिह्यातून परजिह्यात जाण्यासाठी ऑनलाईन प्रवेश पास देणे बंद केले आहे. पण परजिह्यातून जिह्यात येणे सुरुच आहे. 24 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 772 नागरिक परजिह्यातून कोल्हापूरात आले आहेत. यामध्ये मुंबईहून 23, मुंबई निमशहरी विभागातून 2, पालघरमधुन 1, पुणे 40, रायगड 3, सोलापूर 3, ठाणे 4, तर इतर जिह्यातून 696 नागरिक जिह्यात आले आहेत. हे नागरिक जरी संबंधित जिह्यातून प्राथमिक आरोग्य तपासणी करून आले असले तरी आजतागायतचे चित्र पाहता यापैकी बहुतांशी कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे परजिह्यातून येणाऱया व्यक्तींमुळे पुन्हा आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडणार आहे.
परजिल्ह्यातूनयेतानास्बॅबतपासणीबंधनकारककरणेगरजेचे
बाहेरील जिल्ह्यातून कोल्हापूरात येताना संबंधित नागरिकांचे त्या-त्या जिल्ह्यातच स्वॅब घेणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवरच स्वॅब घेतल्यास कोरानाबाधित व्यक्ती जिल्ह्यात येण्यापासून रोखणे शक्य होईल. स्वॅब निगेटिव्ह येणार्यांनाच दुसर्या जिल्ह्यात प्रवेश देण्याबाबत राज्यसरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.








